
डोंबिवलीतून ६२ लाखांचा गुटखा जप्त
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डोंबिवली परिसरातून गुटख्याने भरलेला एक कंटेनर आणि एक टेम्पो जप्त करत तब्बल ८२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुजरातमधून हा गुटख्याचा साठा कंटेनर व टेम्पोमधून डोंबिवली परिसरात आणण्यात आल्यानंतर तो साठा मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड परिसरात वितरित करण्यात येत असल्याचे तपासात आढळून आले आहे. आतापर्यंत या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ- १ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
तुर्भे एमआयडीसी पोलिसांचे पथक रविवारी (ता. १९) पहाटे महापे - शिळफाटा मार्गावरील महापे चेक पोस्टवर नाकाबंदी लावून संशयित वाहनांची तपासणी करत होते. शिळफाटा येथून नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या संशयित टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली असता, सदर टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला १२ लाख रुपयांचा ३० गोणी भरून केसरयुक्त विमल पान मसाला व इतर असा गुटख्याचा साठा आढळून आला होता. पोलिसांनी सदर गुटख्याचा साठा जप्त करून टेम्पोचालकाला अटक केली होती.
डोंबिवलीत वितरित
या तपासादरम्यान, गुटखा गुजरात राज्यातून कंटेनरद्वारे डोंबिवली येथे आणला जात असल्याचे व त्यानंतर त्यातील गुटखा छोट्या वाहनातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरामध्ये वितरित करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी डोंबिवली परिसरातील ऑर्चिड क्राऊन, पलावा सिटी येथून गुटखा व पान मसाल्याने भरलेला टेम्पो व मानपाडा एमआयडीसीमधील पिंपळेश्वर मंदिराजवळ उभा असलेला गुटख्याने भरलेला कंटेनर टेम्पो जप्त केला. यातील टेम्पोमध्ये १४ प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये सुमारे सव्वासहा लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला. तसेच दुसऱ्या कंटेनर टेम्पोमध्ये ५५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा १२७ गोण्या गुटख्याचा साठा आढळून आला.