
बेस्टच्या डबल डेकरला मुंबईच्या रस्त्यांचा दणका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. २४ : बेस्ट उपक्रमाच्या नव्या कोऱ्या बसेससाठी मुंबई मेट्रोने तयार केलेला रस्ता डोकेदुखी ठरत आहे. मुंबई मेट्रो-३च्या कामाअंतर्गत विधान भवन स्टेशनजवळील गतिरोधक नव्या कोऱ्या बसना दणका देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या डबल डेकर बसलाही या स्पीड ब्रेकरचा दणका बसला आहे. त्यामुळे बसच्या मागील बाजूचा काही भाग हा दबला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
बेस्टच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या लो-फ्लोअर एसी डबल डेकर बसला चार दिवसांत मुंबईतील रस्त्यांचा दणका बसला आहे. विधान भवनासमोरील गतिरोधकामुळे या नव्या कोऱ्या डबल डेकर बसच्या भाग गतिरोधकामुळे दबला गेला आहे. बेस्टच्या चालकांकडून ही अशा पद्धतीच्या असमान गतीरोधकाबाबत तक्रारी येत आहेत. प्रवाशांनी भरलेली बस या गती रोधकांवरून नेतानाच बेस्ट बसचालकांची कसोटी लागत आहे. याआधी चाचणीतही गतिरोधकचा अडथळा या लो फ्लोअर बसेसला दिसून आला होता. त्यामुळे विधान भवनानजीकचा गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी बेस्टचालक करत आहेत.
---
नव्या इलेक्ट्रिक बसची रचना लो-फ्लोअर पद्धतीने
जुन्या डबल डेकरच्या तुलनेत या नव्या इलेक्ट्रिक बसची रचना लो-फ्लोअर पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक गतिरोधकावर बस जपून चालवण्याचे आव्हान हे बेस्ट चालकांसमोर आहे. असाच काहीसा अनुभव बसच्या प्राथमिक चाचण्यांच्या वेळीही आला होता. डबल डेकरप्रमाणेच याआधीच्या काही बसेसलाही या गतिरोधकाचा मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.