
खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल
अंबरनाथ, ता. २४ (बातमीदार) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिसांत आज (ता. २४) तक्रार दाखल केली.
खासदार राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत. तसेच डॉ. शिंदे यांनी ठार मारण्याची सुपारी दिल्याचा तथ्यहीन आरोप संजय राऊत यांनी केला, त्यामागे त्यांची बदनामी करण्याचा हेतू दिसत आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे दोन गटांत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करणारे निवेदन शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांना देण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले. या वेळी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, सुवर्णा साळुंके आदी उपस्थित होते.