मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला दिवाळी अंकांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला दिवाळी अंकांचा सन्मान
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला दिवाळी अंकांचा सन्मान

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला दिवाळी अंकांचा सन्मान

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन’ रविवारी (ता. २६) सायंकाळी ५.३० वाजता दासावा, धुरू हॉल, पहिला मजला, छबिलदास लेन, दादर-पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये ‘सकाळ’च्या ‘अवतरण’चा उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून गौरव होणार आहे.  
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ. पी. एस. रामाणी, मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव हे उपस्थित राहाणार असल्याचे मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी सांगितले.

संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राजस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासह वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना ‘दत्ता कामथे स्मृती पुरस्कार’, मराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घेत इतिहासप्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना ‘सेवावृती सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती, मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा, शाखाप्रमुख संजय भगत (प्रभादेवी) पुरस्कृत ‘मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या’, ‘जागतिकीकरण आणि मराठी भाषा’ या विषयांवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री, तर कवयित्री अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव ‘केवल प्रयोगी’ चे सादरीकरण सादर करणार आहेत. या कार्यक्रमास स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनी, मराठी भाषाप्रेमी, अभ्यासक, वाचक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.