Mumbai Local: मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक! 'या' लोकल रद्द; जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local news Central Railway Mega Block today local cancel Know in detail

Mumbai Local: मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक! 'या' लोकल रद्द; जाणून घ्या सविस्तर

Mumbai Local Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या नाहुर आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दोन गर्डर टाकण्याच्या कामासाठी शनिवारी (ता. २५) रात्री तीन तासांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सहाही मार्गिकांवर असणार असल्याने लोकलसह मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे; तर २७ फेब्रुवारीपासून सीएसएमटी आणि ठाणे दरम्यानही रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai Local news Central Railway Mega Block today local cancel Know in detail)

नाहुर आणि मुलुंड स्थानकांदरम्यान गर्डर टाकण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे कोणार्क एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर; हावडा-मुंबई सीएसएमटी मेल दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. शालीमार एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस, मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस आणि हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस निर्धारित वेळेच्या ४० ते ६५ मिनिटे उशिरा इच्छित स्थळी पोहचणार आहे.

ब्लॉकपूर्वी शेवटची कर्जत लोकल सीएसएमटीहून रात्री १२.२४ वाजता सुटेल. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.५२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर कल्याणकडे जाणारी पहिली कर्जत लोकल सीएसएमटीहून पहाटे ४.४७ वाजता सुटेल; तर कल्याणहून ब्लॉकनंतर सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल पहाटे ४.४८ ला सुटणार आहे.

वांगणी-नेरळ स्थानकांदरम्यान ब्लॉक
मध्य रेल्वेच्या वांगणी आणि नेरळ स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर २४ आणि २५ फेब्रुवारी, तसेच ३ आणि ४ मार्च रोजी अभियांत्रिकी कामासाठी मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.५० पर्यंत (३ तास) विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी येथून १२.२४ वाजता सुटणारी कर्जत लोकल बदलापूरपर्यंत धावेल. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल बदलापूर येथून सुटणार आहे.

या लोकल रद्द
मध्य रेल्वेने घेतलेल्या रात्रकालीन ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील काही उपनगरीय सेवा रद्द, तसेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने २७ फेब्रुवारीपासून सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे डाऊन मार्गावरील सीएसएमटीवरून सुटणारी १२.२० कुर्ला, १२.२८ ठाणे, १२.३१ कुर्ला आणि दादर येथून १२.२९ ला सुटणारी ठाणे लोकल रद्द असणार आहे. तसेच आसनगावहून रात्री १०.१० ची सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंत, अंबरनाथहून १०.१५ ला सुटणारी सीएसएमटी लोकल कुर्ल्यापर्यंत, कल्याण येथून १०.५६ ची सीएसएमटी लोकल कुर्ल्यापर्यंत चालविण्यात येईल.