
संतुलित आहार
वैभवी शिंदे, नेरूळ
निसर्गाच्या लहरीपणाचा माणसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. सध्या तापमानाच्या पारा वाढल्याने दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. अशा वेळी शरीर संतुलित ठेवण्यासाठी आहारावरही विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. उन्हामुळे भूक मंदावणे, डिहायड्रेशन, उष्माघात, अॅसिडिटी, डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे, थकवा जाणवणे आदी समस्या उद्भवतात. ॠतुमानानुसार आहारात बदल केल्यास, प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते. दिवसभरात अधिकाधिक पाणी पिणे, व्यायाम करणे अथवा योगाभ्यास, प्राणायाम करणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात होणारे आजार
- उन्हात गेल्यास अनेकदा डिहायड्रेशनचा त्रास होतो, अशक्तपणा, थकवा जाणवतो. चक्कर येते, हे टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, हंगामी फळे खाणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
- संसर्गजन्य तापामुळे अंगदुखी, घसा खवखवणे, सर्दी-खोकला, डोकेदुखीचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी हलका आहार घ्यावा, मसालेदार पचण्यास जड पदार्थ खाणे टाळावे.
- अनेकदा बाहेरचे, उघडण्यावरील खाद्यपदार्थ खाल्याने अपचन होते. पोटदुखी, उलटी होते. अशा वेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी लिंबू पाणी, ग्लुकोज, फळांचा रस आदींचे सेवन करावे.
- उष्माघातामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे, शरीरात त्राण नसल्यासारखे वाटणे आदी समस्या उद्भवतात. अशा वेळी उन्हापासून बचावासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
उन्हापासून बचावासाठी
- उन्हामुळे त्वचा कोरडी पडते अशा वेळी घरातून बाहेर पडताना सुती, हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे, गॉगल्स घालणे, टोपी-ओढणी, स्टोलचा वापर करणे आवश्यक आहे.
- चहा, कॉफी, आणि मद्यपान या गोष्टीचे सेवन टाळावे, त्याऐवजी शहाळे, संत्री, मोसंबी, कलिंगड आणि लिंबू या फळाचा रस घ्यावा, आहारात फळे, हिरव्या भाज्यांना प्राधान्य द्यावे. काकडी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, बीट आदींचा आहारात समावेश करावा.
- एकाच वेळी न जेवता, दिवसातून -तीन वेळा थोडे थोडे खावे. रात्रीच्या वेळी जागरण टाळावे, पुरेशी झोप घ्यावी.
- उन्हाळ्यात शक्यतो मसाल्याच्या पदार्थ टाळावे, तेलकट पदार्थ वर्ज्य करा. साधे, सात्त्विक जेवणावर भर द्यावा. बेकरीतील खाद्यपदार्थ, जंकफूड टाळावेत.
- उन्हातून आल्यावर लगेच कुलर अथवा एसीमधे बसू नये. त्यामुळे सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास होतो.
उन्हाळ्यात घामोळ्या, डोकेदुखी, हीट स्ट्रोक, डायरिया, संसर्गजन्य तापाचे प्रमाण वाढते. अशा वेळी सकस व संतुलित आहार घ्यावा. भरपूर पाणी प्यावे,
- डॉ. मृणाली वाघचौरे, एमडी, आयुर्वेद