
संत सावळाराम महाराज विद्यालयास मदत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : कल्याण ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आगरी समाजाचे पहिले संत सावळाराम महाराज यांनी ढोके गावात ज्ञान मकरंद विद्यालय उभारले. त्यांच्या पश्चात शाळेचे नाव सावळाराम महाराज विद्यालय ढोके असे ठेवण्यात आले. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी ग्रामीण पट्ट्यातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिवसेनेचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी बाक भेट स्वरूपात देत विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था केली आहे.
आगरी समाजाचे संत सावळाराम महाराजांनी बांधलेल्या विद्यामंदिराची दुरवस्था झाली आहे. लोकवर्गणीतून शाळेची स्थिती सुधारण्यासाठी हभप विनित महाराज, मोरेश्वर पाटील, महेंद्र पाटील, शाळेचे माजी विद्यार्थी शुभम साळुंखे हे प्रयत्न करीत आहेत. शाळेच्या दुरवस्थेचे चित्र लोकांसमोर मांडल्यानंतर आगरी समाजातून अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. शाळेचे जतन व्हावे, यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच कार्यास शहरप्रमुख गायकवाड यांनीदेखील हातभार लावला आहे. यापूर्वी गायकवाड यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व अत्यावश्यक असलेल्या वस्तूंचा पुरवठा केला होता. शाळेच्या वास्तूची पाहणी केली होती. त्यानंतर आता स्वखर्चातून शाळेत त्यांनी बाक भेट स्वरूपात दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आसनव्यवस्थेची सोय झाली आहे. शाळा प्रशासनाच्या वतीने गायकवाड यांचे आभार मानण्यात आले आहेत. शाळेच्या जतनासाठी व दुरुस्तीसाठी इतरांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.