गावागावांत योगाची क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावांत योगाची क्रेझ
गावागावांत योगाची क्रेझ

गावागावांत योगाची क्रेझ

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग
धावपळीच्या जीवन, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आहाराच्या अनियमित वेळांमुळे महिलांना स्‍वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्‍यांना अनेक आजार जडतात. हे टाळण्यासाठी महिलांच्या निरोगी आयुष्‍यासाठी सरकार, सामाजिक संस्‍थांकडून नेहमीच जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात. त्‍यामुळे शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील महिलाही स्‍वतःच्या आरोग्‍याबाबत सजग झाल्‍या असून शारीरिक, मानसिकदृष्‍ट्या सक्षम होण्याकडे लक्ष देत आहेत. त्‍यासाठी गावागावांत योगाभ्यासाचे धडे घेतले जात आहेत. अवघ्‍या १०-१२ वर्षांच्‍या मुलींपासून ७५ वर्षांच्या महिला हिरीरिने अभ्‍यास केंद्रात स्वतःला संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्‍न करीत आहेत.
शारीरिक स्‍वास्‍थ्‍याबरोबरच मानसिक स्‍वास्‍थही तितकेच महत्त्वाचे असते. मन शांत, प्रसन्न, समाधानी असेल तर शारीरिक हालचालींत स्‍थैर्य येते, एकाग्रता वाढते, आत्‍मविश्‍वास बळावतो. योगासने, प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. योगासनांमुळे शरीर लवचिक राहते. स्नायूंना बळकटी येते. श्‍वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे आणि ध्यानधारणेमुळे शारीरिक ताणतणाव कमी होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागातही ठिकठिकाणी योगाभ्‍यास केंद्र सुरू झाल्‍याचे दिसून येत आहे.
तणाव दूर करण्यासाठी योगाभ्‍यास महत्‍वाचा ठरत आहे. काही ग्रामपंचायत, काही सामाजिक संस्थामार्फत योगाभ्‍यासाचे वर्ग सुरू करण्यात आले असून हजारो महिला योग, प्राणायामकडे करण्याला प्राधान्य देत आहेत.

योगशिक्षिका ऐश्वर्या समेळ यांचा सन्मान
शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम राहणे, ही काळाची गरज आहे. हे ओळखून अलिबाग तालुक्यातील चोंढी-किहीम येथील ऐश्वर्या रवींद्र समेळ यांनी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे योगाभ्याचे शिक्षण घेतले. आपल्या शिक्षणाचा फायदा गावांतील महिला, तरुणींसाठी व्हावा यासाठी पुढाकार घेतला. २०१७ पासून योगा शिकविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तीन ते चार महिलांना योगांचे धडे दिले. आज पाचशेहून अधिक महिलांना योगा शिकविले जात आहे. जिल्ह्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहेत. आरोग्य जपण्याचे, योगांचे महत्त्व पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील नऊ वर्षांपासून ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांना योगासने शिकवित आहे. अलिबागसह, डोलवी, पनवेल, खालापूर अशा अनेक तालुक्यांतील महिला यामध्ये सहभागी होत आहेत. ग्रामीण भागात योगा पोहचविण्याचे काम करणाऱ्या ऐश्वर्या समेळ यांच्या कार्याची दखल घेत लायन्स क्लब अलिबागच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
-------------------------