
एनएसएस राष्ट्रीय एकता शिबिरात महाराष्ट्राची बाजी
मुंबई, ता. २५ ः मुलांना येथील महर्षी मार्कंडेश्वर डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीमध्ये एन.एस.एस. राष्ट्रीय एकता शिबिर १४ ते २० फेब्रुवारीदरम्यान पार पडले. यामध्ये बिहार, झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, हरियाना अशा एकूण १७ राज्यांनी भाग घेतला. स्किट व सांस्कृतिक प्रदर्शनात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे शिबिर विश्वविद्यालयाचे कुलगुरू तरसेम गर्ग व एन.एस.एस. समन्वयक डॉ. करण अग्रवाल यांच्या निर्देशानुसार पार पडले.
महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे डॉ. सूर्यभान डोंगरे, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी व विभागप्रमुख अगदतंत्र आयुर्वेद महाविद्यालय, शीव यांच्या नेतृत्वाखाली पर्निका चौधरी, प्रियंका घुबडे, चेतना पाटील, आदित्य शिंदे, यश पांडे व नागोराव मोरे यांनी केले. त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची प्रशंसा केली जात आहे.
या प्रकारांत पटकावले यश
राष्ट्रीय एकता शिबिरात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात १७ राज्यांनी सहभागी होऊन प्रदर्शन केले. यामध्ये महाराष्ट्राने सांस्कृतिक प्रदर्शनात व स्किटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सांस्कृतिक नृत्य व रांगोळीमध्ये द्वितीय येण्याचा बहुमान मिळाला; तर सांस्कृतिक कार्यक्रमात स्वयंसेवकानी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वेशभूषेसह प्रस्तुत केले. विद्यार्थ्यानी नुक्कड नाटकातून आयुर्वेदाच्या सादरीकरणाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच ‘बेस्ट आऊट ऑफ द वेस्ट’ यामध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती सुंदर व आकर्षक असा शिवनेरी किल्ला तयार करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले यात विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित केले.
अतिथींचे स्वागत करण्याचा सन्मान
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उपस्थित अतिथींचे स्वागत आपल्या सांस्कृतिक वेशभूषेतून करण्याचा सन्मान मिळाला. या सर्व विद्यार्थ्यांचा व कार्यक्रम अधिकारी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन या कार्यक्रमप्रसंगी सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमप्रसंगी सर्व राज्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मानही महाराष्ट्राच्या यश पांडे याला मिळाला.