सेतू सहकाराचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेतू सहकाराचा
सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा

sakal_logo
By

शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

आईचे नाव आदरापोटी भागदाखल्यावर टाकावे का?

प्रश्न - माझे व माझ्या आईचे घराचे खरेदीखत एकत्रितपणे नोंदणीकृत केले आहे, त्याच क्रमानुसार भाग दाखल्यावरील नावे आहेत. आईचे नाव केवळ मातृभाव आणि आदर यासाठी होते, खरेदीसाठी सर्व रक्कम माझ्याच खात्यातून गेली आहे. आईचा मृत्यू झाल्यावर माझे इतर भाऊ त्यात हिस्सा मागू शकतात का? तसेच आईचे नाव केवळ भाग दाखल्यावर असल्याने ते त्यावरून वगळून सदनिकेमध्ये सर्व हक्क मलाच मिळू शकतात का?
- अमित नाईक, अशोक नाईक, दहिसर.

उत्तर - सर्वसाधारणपणे सर्व कुटुंबांमध्ये हा रीवाज थोड्याफार फरकाने पाहायला मिळतो, यामध्ये हेतू केवळ आदर किंवा मातृभाव हाच असतो. जोपर्यंत कुटुंबामध्ये वादविवाद नाहीत तोपर्यंत कोर्ट-कायदासुद्धा त्याला मान्यता देतो व त्यात दखल देत नाही. आता कायद्याचे बोलायचे झाले तर ते असे आहे की, ज्या व्यक्तींची नावे नोंदणीकृत दस्तामध्ये आहेत व ती नोंदणीकृत गोष्ट जर अचल संपत्ती असेल, तर नियमानुसार त्या व्यक्तीचाही त्यात हिस्सा व सहभाग आहे, असे कायद्याचे स्पष्टपणे म्हणणे आहे. कायदा अशा बाबतीत ती सहहिस्सेदारांची मिळकत असेच पाहतो. या नोंदणीकृत दस्तामध्ये त्या व्यक्तींचा किती सहभाग आहे, याबद्दल जर उल्लेख असेल, तर तो हिस्सा व भाग आहे तसा, म्हणजे उदा. २५ टक्के व ५० टक्के, असे मान्य करतो; परंतु उल्लेख नसल्यास दोन व्यक्तींचा सहभाग हा निम्मा म्हणजे प्रत्येकी ५० टक्के असाच मानला जातो. या नियमानुसार तुम्हाला तुमच्या समस्येवर विचार करून मार्ग काढावा लागणार आहे. आपल्या प्रश्नाचे दोन कायदेशीर भाग आहेत, त्यापैकी एक संस्थास्तरावर व दुसरा तुमची मालमत्ता व त्यामधील हक्काबाबत.

आईचा मृत्यू झाल्यास महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार त्यांचे सभासदत्व संपुष्टात येते. त्यामुळे त्यांचे नाव भाग दाखला तसेच संस्थेच्या दप्तरांमधून काढून टाकण्यात येईलच; पण त्याने आईच्या वारसांचे आईच्या हिश्श्यासंबंधित हक्क, मालमत्ता कायद्यानुसार संपुष्टात येत नाहीत. आईचे सर्व हक्क मालमत्ता कायद्यानुसार त्यांच्या वारसांकडे जाणे आवश्यक आहे. भाग दाखला, संस्थेचे दप्तर यामधून आईचे नाव वगळून तुम्हाला तुमच्या आईचे सर्व हक्क मिळाले, असे होणार नाही. तुमच्या भाऊ, बहिणी असल्यास व त्यांनी तुमच्या आईच्या मालमत्तेवर हक्क सांगितल्यास कायद्याचा प्रश्न उभा राहणार आहे. याविषयी आपण आपल्या भाऊ, बहिणी असल्यास त्यांच्याकडून वकिलाच्या सल्ल्याने योग्य कागदपत्रे बनवा व त्यांचे नोंदणीकृत दस्त बनवून हक्कांचे हस्तांतरण करणे योग्य व कायदेशीर होईल. आईच्या मृत्यूनंतर जर तुमच्या भाऊ, बहिणी यांनी आईचे मालमत्तेमधील हक्क तुम्हाला देण्याचे दस्त बनवल्यास ते सर्व हक्क तुमच्याकडे नक्की येतील.

प्रश्न - माझी संस्था पनवेल येथे असून ती सिडकोच्या जागेवर बांधण्यात आली आहे, तिचे १५६ सभासद आहेत. संस्थेमध्ये अनेक गैरव्यवहार आहेत, वार्षिक सर्वसाधारण सभा, अहवाल, नफा तोटा पत्रक सन २०२०-२१ व २०२१-२२ ची मंजूर करण्यात आली नाहीत, यावर उपाय काय?
- पंकज कांबळे, पनवेल

उत्तर - आपण सांगत असलेली बाब सत्य असेल, तर आपण त्वरित पनवेलच्या सहकार निबंधक कार्यालयामध्ये सहकार कायदा क्रमांक ७८ अन्वये तक्रार दाखल करावी. निबंधक तुमच्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घेऊ शकतात किंवा सुनावणीची नोटीस देऊन, आपल्या तक्रारीची खातरजमा करून, तक्रार निकाली काढू शकतात. या तक्रारीमध्ये आपल्या संस्थेमधील दोषी पदाधिकारी यांच्याविरुद्ध कायदा कलम ७५ अन्वये कार्यवाही होऊन त्यांना काही वर्षांकरिता अपात्र घोषित करून समितीवरून काढून टाकण्यात येऊ शकेल. तसेच त्यांना येणाऱ्या संस्थांच्या निवडणुकांसाठी मनाई करण्यात येऊ शकेल. कायदा क्रमांक ७५ (१) अन्वये लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण सभा दरवर्षी ३० सप्टेंबरच्या अगोदर घेणे आवश्यक आहे; अन्यथा पदाधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कायदा कलम ७५ (२) अन्वये संस्था पदाधिकारी कोणती कागदपत्रे सर्वसाधारण सभेपुढे ठेवतील, याची यादी देण्यात आली आहे. कायदा क्रमांक ७५ (३) अन्वये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वाक्षरीने ताळेबंदासोबत काही महत्त्वाच्या बाबींचा अहवाल सभासदांना देणे बंधनकारक आहे. कायदा क्रमांक ७५ (४) अन्वये दोष दुरुस्ती अहवाल संस्थेने सादर करणे बंधनकारक आहे. कायदा क्रमांक ७५ (५) अन्वये या सर्व बाबींचे पालन करणाऱ्या समिती पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यात कसूर केली असल्यास दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. त्या दंडात्मक कार्यवाहीमध्ये अशा सदस्यांना निवडणूक लढविण्यास अपात्रता, दंड आदी कारवाईची तरतूद आहे. आपण याविषयी कायद्याच्या जाणकार व्यक्तीकडून तक्रार तयार करावी. त्याची एक प्रत संस्थेला देऊन त्याची पोच घ्यावी. तसेच स्वतंत्र तक्रार निबंधक कार्यालयात दाखल करून त्याचा पाठपुरावा करावा.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील इ मेल वर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in