दहशत भटक्या श्‍वानांची

दहशत भटक्या श्‍वानांची

वाशी, ता. २६ (बातमीदार) : शहरातील रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. प्रतिदिन २५ ते ३५ जणांना कुत्रे चावत असल्याची घटना घडत आहे. मागील सहा वर्षांत ६३ हजार ११७ जणांना श्‍वानांनी चावा घेतला आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांची दहशत कमी करण्यासाठी महापालिकेने श्‍वान निर्बिजीकरणाचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे वर्षानिहाय श्वानदंशाच्या घटना कमी होऊ लागल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान सर्वच विभागांत भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. रोडवर घोळका करून असलेल्या कुत्र्यांमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुचाकी व इतर वाहनांचा कुत्रे पाठलाग करत असतात. यामुळे अपघातही होत आहेत. अचानक हे भटके कुत्रे चावा घेत असतात. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनाही वाढत आहेत. विशेषतः रात्री उशिरा ये-जा करणाऱ्या नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१७-१८ पासून सहा वर्षांत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ६३ हजार ११७ जणांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१७-१८ मध्ये सर्वाधिक १३ हजार ७८३ श्वानदंश झाले होते. हे प्रमाण प्रतिदिन सरासरी ३७ एवढे होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी दरम्यान ८ हजार ८२४ जणांना श्वानदंश झाला आहे. २०२०-२१ पासून श्वानदंशाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

वर्ष श्वानदंश
२०१७-१८ १३७८३
२०१८-१९ १२२९५
२०१९-२० १०४८२
२०२०-२१ ७७७२
२०२१-२२ ९९६१
२०२२-२३ ८८२४

निर्बिजीकरण केंद्र सुरू
महापालिकेने श्वान निर्बिजीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. तुर्भे डम्पिंग गाऊंडवर निर्बिजीकरण केंद्र सुरू केले आहे. २०१४ पासून महापालिकेने श्वान निर्बिजीकरण वाढवले आहेत. मागील सात वर्षांत ४९ हजार श्वान पकडले आहेत. त्यामधील २५ हजारांपेक्षा जास्त श्वानांचे निर्बिजीकरण केले आहे. शहरातील निर्बिजीकरणाचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात सर्वाधिक निर्बिजीकरणाचे प्रमाण नवी मुंबईमध्ये आहे.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात श्वान निर्बिजीकरणाचे प्रमाण राज्यात सर्वांत चांगले आहे. भटक्या कुत्र्याचे निर्बिजीकरण व उपचारांवर लक्ष केंद्रित केले आहे.
- श्रीराम पवार, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com