कल्याणच्या जलतरणपटूंची मोहीम फत्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणच्या जलतरणपटूंची मोहीम फत्ते
कल्याणच्या जलतरणपटूंची मोहीम फत्ते

कल्याणच्या जलतरणपटूंची मोहीम फत्ते

sakal_logo
By

कल्याण, ता. २५ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेक्रेड हार्ट स्कूल कल्याणच्या १४ विद्यार्थ्यांनी मुरूड जंजिरा किल्ला ते पद्मदुर्ग असे नऊ किलोमीटरचे अंतर पोहून पार केले. या मोहिमेतील सर्व मुले ही १२ ते १८ वयोगटातील असल्याने या मुलांचे कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यातील अनेक गड-किल्ले यांची दुरवस्था झाल्याने याकडे शासनाने लक्ष द्यावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या गड-किल्ल्यांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. या उपक्रमामुळे जलदुर्ग आणि गड-किल्ल्यांकडे लोकांचे लक्ष वेधावे आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळावी, अशा उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती या मोहिमेचे प्रमुख श्रीराम म्हात्रे यांनी दिली. या उपक्रमात कल्याणचे सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अमोदिनी तोडकर, समृद्धी शेट्टी, तृष्णा शेट्टी, अद्विता जोडकर, अभिप्रीत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धार्थ पात्रा, मयंक पात्रा, निनाद पाटील, समर मोहोपे हे धाडशी विद्यार्थी सहभागी झाले व मोहीम यशस्वीपणे पार पडली. तसेच सोबत शिक्षक रामचंद्र म्हात्रे, काशीनाथ मोहोपे, संदीप तोडकर, देवेन्द्र साळुंखे, निलेश पाटील हे शिक्षक व पालकही होते.

------------------
मुख्याधिकारी पंकज भुसे यांचा उत्स्फूर्त सहभाग
जलतरणपटूंची मुरूड किल्ल्यात जाण्याची तयारी सुरू असताना मुरूडचे मुख्याधिकारी पंकज भुसे रस्त्यावरून जात होते. जलतरणपटू जंजिरा किल्ला पोहून जाणार हे समजताच गाडीतून उतरून त्यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. कोणतेही पोहण्याचे साधन नसताना गॉगल, टोपी, स्वीमिंग सूट नसताना समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि न थांबता त्यानी हे अंतर पार केले.