गावागावांत शिमगोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावांत शिमगोत्सव
गावागावांत शिमगोत्सव

गावागावांत शिमगोत्सव

sakal_logo
By

अजित शेडगे, माणगाव
परंपरा जपणारा व आनंद देणाऱ्या शिमगोत्सवाला शुक्रवारपासून (ता.२४) सुरुवात झाली आहे. रायगड जिल्‍ह्यातील अनेक गावांतून पारंपरिक शिमगोत्सवाचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत असल्‍याचे चित्र आहे. पौर्णिमेच्या आधी, नऊ दिवस गावोगावी पिले लावण्यास सुरुवात झाली आहे. यंदा ६ मार्चला होलिकोत्सव असून उत्सवाला छोट्या होळीने सुरुवात झाली आहे. पारंपरिकतेनुसार गावोगावी आजही छोट्या होळीची परंपरा जपली जाते. यावेळी लहान मुले, ज्येष्ठ मंडळी ग्रामदेवतेला साकडे घालून लहान होळीने सुरुवात करतात. सतत नऊ दिवस विविध प्रकारे लहान होळीचा आनंद घेतला जातो.
होलिकोत्‍सवात झाडांच्या सुकलेल्‍या फांद्या, गवत, पालापाचोळा, गवऱ्या आदींचा वापर करत होलिकादहन करण्यात येते. जिल्हाभरात तीन हजारांहून अधिक होळीकादहन करण्यात येते. यानंतर गावोगावी धुलीवंदनाचा जल्‍लोष पाहायला मिळतो. रंगपंचमीच्या दिवशी होलिकोत्सवाची सांगता होऊन पालखी सोहळ्यात देव आपापल्या स्थानी नेण्यात येतात. होळीला जलार्पण करून होलिकोत्सवाची सांगता होते. आगळ्या प्रथेचे वैविध्य असलेला हा उत्सव कोकणात पारंपरिकरित्‍या साजरा केला जातो. तमाशा, खेळे, डेरे, टिपरी नृत्य, सामूहिक गाणी, बालवधू-वर, लोकनृत्य आदी प्रकारांचे घरोघरी जाऊन सादरीकरण केले जाते. शिमगोत्‍सवातून पारंपरिकता जपली जात असून सामाजिक एकता व सद्‌भावाचे दर्शन होते.

लोककलांचे सादरीकरण
होलिकोत्सवानिमित्त ग्रामीण भागांत पारंपरिक प्रथांचे दर्शन होते. ढोलकी घुंगराच्या तालावर नृत्य प्रकार सादर करण्यात येतात. लहान मुले, तरुण पौराणिक वेशभूषा, मुखवटे घालून घरोघरी जाऊन मनोरंजनात्मक कला सादर करतात. उत्‍सवातील पोस्त परंपरा गावोगावी आजही कायम असून यानिमित्त ग्रामस्‍थ सामूहिक भोजनाचा आनंद घेतात. आपापसातील वाद, मतभेद मिटवित ग्रामस्थ पोस्तमध्ये सहभागी होतात. गावोगावी विविध स्पर्धा, धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गणेशोत्सवानंतर शिमगोत्सवाला चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गावोगावी उपस्थिती असते.

घरोघरी ग्रामदेवतचा जागर
शिमगोत्सव मनोरंजनाला विशेष महत्त्‍व आहे. गावोगावी लोककला, लोकसंस्कृती जपण्याचा प्रयत्‍न केला जातो. प्रत्येक गावात वैशिष्ट्यपूर्ण कलेचे सादरीकरण केले जाते. गावच्या फडावर तमाशा रंगतो, गाणी नृत्याच्या फैरी झडतात. घरोघरी जाऊन ग्रामदेवतेचा जागर केला जातो. ढोलकी, घुंगरू, तुणतुणे, गायक आणि नृत्य करणारा नायक असा साज गावागावांतून फिरतो. काही भागात टिपरीच्या तालावर नृत्य केले जाते. तर काही गावांत मडक्याला विशिष्ट झाडांच्या पाती लावून त्यातून निर्माण होणाऱ्या विशिष्ट आवाजानुसार गाणी सादर केली जातात. त्याला डेरा म्हणतात.

शिमग्‍याचे सोंग
शिमग्याचे सोंग जिल्‍ह्यात फार प्रसिद्ध आहे. पत्र्याच्या लहान डब्यांना प्लॅस्टिक गुंडाळून तयार केलेली वाद्ये, तोंडावर मुखवटे आणि चित्रपटातील, भजनातील आणि लोकसंगीतातील गाणी म्हणत घरोघरी जात हि कलाकार मंडळी पोस्त जमा करतात. मुली सुद्धा खोटेखोटे नवरा-नवरी बनून घरोघरी जात गाणी म्हणत पोस्त जमा करतात. गावातील दुकानदार, गाडीवाले, प्रवासी, व्यापारी, फेरीवाले यांच्याकडून पोस्त जमा केला जातो आणि सारेजण एकत्र येत जमलेल्‍या पैशातून समूह भोजन, विविध पदार्थ बनवून खातात.

शिमगोत्सव आनंदाचा उत्सव आहे. आबालवृद्ध या उत्‍सवात सहभागी होतात. लोककलेच्या माध्यमातून परंपरा, रूढी जपण्याचा प्रयत्‍न केला जातो.
- राजेश भावे, उत्सवप्रेमी