
मिरा भाईंदरमध्ये शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा
प्रकाश लिमये, भाईंदर
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा मिरा-भाईंदरमध्ये स्थापित केला जाणार आहे. मिरा भाईंदरचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या घोडबंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील चौकात महामार्गालगत महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा तीस फूट उंचीचा असणार आहे.
घोडबंदर किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे. या किल्ल्याचे जतन व्हावे यासाठी हा किल्ला महानगरपालिकेने पुरातत्त्व खात्याकडून दत्तक घेतला आहे. किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या किल्ल्यात काही दिवसांपूर्वीच भव्य असा १०५ फुटी भगवा ध्वज उभारण्यात आला आहे. त्यापाठोपाठ किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुंबई अहमदाबाद रस्त्यावरील सगणाई मंदिर चौकात महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. पुतळ्यासाठी होत असलेल्या विलंबामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली होती. आता पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या महापालिकेला मिळाल्या आहेत. तसेच यास ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम मंजुरी नुकतीच महापालिकेच्या हाती पडली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा राज्यातील सर्वात उंच पुतळा ठरणार असून महामार्गालगत तो उभारला जाणार असल्यामुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. याआधी औरंगाबाद महापालिकेने महाराजांचा एकवीस फूट उंचीचा पुतळा उभारला आहे.
असा असणार पुतळा
महाराजांचा अश्वारूढ पुतळा पन्नास फूट उंच असणार आहे. त्यातील चौथरा वीस फूट उंच असून प्रत्यक्ष पुतळा तीस फूट उंचीचा असणार आहे. हा पुतळा ब्राँझ धातूचा असणार आहे, तर चौथऱ्याचे काम सुरु आहे. पुतळ्यासाठी एकंदर दोन कोटी ९५ लाख रुपये खर्च आला आहे. याव्यतिरिक्त पुतळा असलेल्या चौकाचे सुशोभीकरणही करण्यात येत असून त्यासाठी ६५ लाख रुपयांचा खर्च आला आहे.