
लाकडी घाणा प्रकल्पातून महिला सक्षमीकरण
विरार, ता. २५ (संदीप पंडित) : पालघर जिल्ह्यात शेतीत जसे वेगवेगळे प्रयोग करण्याचे धाडस तरुण पिढी करत आहे. तसेच धाडस ही पिढी शेतीवर आधारित उद्योगामध्येही करताना दिसत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे वानगाव चिंचणी येथील प्रगतशील शेतकरी चिन्मय राऊत होय. शेतीत भाताबरोबरच ऑर्किड फुलांचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता लाकडी घाण्यातून तेल तयार करण्याचा प्रयोग ही त्यांनी यशस्वी केला आहे. एव्हढ्यावर न थांबता त्यांनी आदिवासी महिला सक्षमीकरणावरही भर देऊन महिलांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे.
सध्या प्रत्येक वस्तूत शुद्धता मिळवण्यासाठी नागरिक लाकडी घाण्यापासून तयार करण्यात येणाऱ्या तेलाकडे वळू लागले आहेत. आजचे खाद्यतेल प्रिझरव्हेटिव्हज आणि अॅडिटीव्हजने मोठ्या प्रमाणात दूषित आहेत. जर ते दररोज सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळेच शुद्धतेवर भर देणाऱ्या आणि लाकडी घाण्यापासून सर्वांत शुद्ध नैसर्गिक तेल घेण्याकडे नागरिकांची असलेली पसंती लक्षात घेऊन चिन्मय राऊत यांनी लाकडी घाणा तयार केला आहे. त्यांचा हा कारखाना पालघरमधील आदिवासी महिला चालवत असून यातून त्यांनी महिला सक्षमीकरणावरही भर दिला आहे.
-------------------------
नवीन पिढीचा कल वाढला
लाकडी मुसळाच्या सहायाने तेलबिया दाबण्याच्या प्रक्रियेद्वारे खाद्यतेल काढले जाते. प्रक्रियेदरम्यान तापमान ४० ते ६० अंश सेल्सिअस असते जे तेलाचा नैसर्गिक सुगंध अबाधित ठेवताना पोषक आणि जीवनसत्त्वे नष्ट होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. लाकडी घाण्यापासून काढलेले तेल हे आरोग्यदायी असून त्यामध्ये कोणतेही ट्रांन्स फॅट्स नसतात. लाकडी घाण्यावर सूर्यफूल, करडई, मोहरी, भुईमूग, खोबरे तसेच तिळाच्या तेलाचे उत्पादन करण्यात येत आहे. कारखाने येण्यापूर्वी घाण्यावर काढलेले तेलच आपले पूर्वज वापरत होते. त्याकडे आता पुन्हा एकदा नवीन पिढी ही वळू लागली असल्याचे दिसून येत आहे.
========
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती असून याठिकाणी शेतीत प्रयोग करून अनेक नवनवीन उत्पादने घेतली जात आहेत. त्याचप्रमाणे तेल निर्मितीसाठी लागणारी उत्पादनेही मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याने याठिकाणी तेल काढण्यासाठी घाणा उभारण्यात आला आहे. हे करत असताना या ठिकाणाहून आपल्याकडच्या आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केले. आज तेल काढण्याचे पूर्ण काम आदिवासी महिलाच करत आहेत.
चिन्मय राऊत, प्रगतिशील शेतकरी, चिंचणी