
मुंबईत घातपाताची धमकी; आरोपीला १० तासांत अटक
मुंबई, ता. २५ : फोनवरून मुंबईत घातपाताची धमकी देणाऱ्या तरुणाला १० तासांत अटक करण्यात जे. जे. मार्ग पोलिसांना यश आले आहे. अश्विन भारत महिसकरने असे आरोपीचे नाव असून तो नागपूर येथील रहिवासी आहे.
जे. जे. रुग्णालय, भेंडीबाजार व नळ बाजार परिसरात बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांच्या दक्षिण नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक रूपाली कदम या दक्षिण नियंत्रण कक्षात कार्यरत असताना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबईच्या बंदरगाह परिसरात २३ फेब्रुवारीला ९० किलो स्फोटके उतरवण्यात आली असून जे. जे. हॉस्पिटल, भेंडीबाजार, नळबाजार परिसरात स्फोटकांच्या साह्याने बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याने नाव न सांगता फोन कट केला. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिली. त्यानंतर जे. जे. मार्ग पोलिस तसेच येलोगेट, कुलाबा, मरिन ड्राईव्ह, डी. बी. मार्ग या पोलिस ठाण्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. आरोपी अश्विनने पालघर येथील डहाणू रेल्वेस्थानकावरून फोन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार डहाणू पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यांनी माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले.