
पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने रचला लुटीचा कट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पत्नी पैशांची उधळपट्टी करते. तिला धडा शिकवण्यासाठी आणि सासुने दिलेले पैसे लाटण्यासाठी लोखंडवाला येथील व्यावसायिकाने ४४ लाख रुपयांच्या लुटीचा बनाव रचला होता. मात्र आरोपी पतीने आग्रीपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे आढळून आल्याचे त्यांच्या गुन्ह्याचा संशय आला. या प्रकरणाचा सखोल तपास करत पोलिसांनी अमीर मोहम्मद बोरा याला शुक्रवारी (ता. २४) रात्री अटक केली.
लोखंडवाला येथे राहणाऱ्या व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी पैशांची सतत उधळपट्टी करत असल्याचे त्याला पसंत नव्हते. दुबईत राहणाऱ्या त्याच्या सासुने घर घेण्यासाठी ४४ लाख रुपये पत्नीला दिले होते. मात्र हे पैसे देखील ती मौजमजेसाठी खर्च करेल, अशी त्याला भीती होती. पत्नीला धडा शिकवण्यासाठी आणि चोरी झाल्याचे समजताच तिला पैशांची किंमत समजेल, यासाठी त्याने स्वत:च्याच लुटीचा डाव रचला. त्यानुसार ना. म. जोशी मार्गावरून जात असताना पोलिस असल्याची बतावणी करत चौकडीने त्याच्याकडील ४४ लाखांची रोकड चोरून नेल्याची आग्रीपाडा पोलिसांत गुरुवारी (ता. २३) तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र व्यावसायिकाने दिलेली माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांमध्ये तफावत दिसून आली. त्याच्यावरच पोलिसांचा संशय बळावल्याने सखोल चौकशी केली असता, लूट झालीच नसल्याची कबुली त्याने दिली. अखेर पोलिसांनी मालाडच्या घरातून रोकड जप्त केल्याचे सांगण्यात आले.