
गावठी पिस्तुलासह एकाला अटक
नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला नालासोपारा येथून पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष-२ वसईच्या पथकाला यश आले आहे. या आरोपीकडून एक गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतुसे आणि एक रामपुरी चाकू जप्त करण्यात आला आहे. पृथ्वीराज कुंदनप्रसाद भारती असे आरोपीचे नाव असून, तो वसई पूर्व गोखिवरे, आंबेडकर नगर जानकीपाडा येथील सूरज गवारी चाळीमध्ये राहतो. नालासोपारा पूर्व ओसवाल नगरी या ठिकाणी हा आरोपी अवैध पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष- २ वसई युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक शाहूराज रणविरे यांच्या पथकाला माहिती मिळाली होती. या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी सापळा रचून या संशयित आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतुसांसह एक रामपुरी चाकू सापडला आहे. या हत्यारांसह आरोपीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी आचोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.