भिवंडीतील ४३ गावांमध्ये ‘जलक्रांती

भिवंडीतील ४३ गावांमध्ये ‘जलक्रांती

वज्रेश्वरी, ता. २६ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरविण्यासाठी सुरू केलेल्या ‘हर घर नल से जल’ योजनेतून जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यात ‘जलक्रांती’ होत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील ४३ गाव-पाड्यांमध्ये जल जीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे १४८ कोटी रुपये खर्चून नळाने पाणीपुरवठा करण्याच्या योजनांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते अंबाडी येथे भूमिपूजन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’द्वारे केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून ग्रामीण भागातील गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती दररोज ५५ लिटर पाणी पुरविले जाणार आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील १९६ गाव-पाड्यांमध्ये जल जीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १० नव्या नळ पाणीपुरवठा योजना व सध्याच्या योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक दिवस
जल जीवन मिशनच्या माध्यमातून २२६ कोटी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे १५५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर आज केवणीदिवे, कोपर, वडुनवघर, जुनांदुर्खी, कांबे, खोणी, टेंभिवली, अंबाडी, कवाड येथे झालेल्या कार्यक्रमात भूमिपूजन करण्यात आले. एकाच दिवशी तब्बल २०६ योजनांचे भूमिपूजन झाल्याने, भिवंडी ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला. या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा दूर होणार असून, त्यांना घरातच नळाने पाणी उपलब्ध होणार आहे.
-----------------------------------------------
प्रत्येक गावाची २०५२ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन योजना आखण्यात आल्या आहेत. गावांचा विकास शहरासारखा झाला पाहिजे, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. प्रत्येक गावातील नळपाणीपुरवठा योजनांचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहाणे गरजेचे आहे.
- कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com