पार्किंगच्‍या गैरसोयीने मुलुंडकर हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्किंगच्‍या गैरसोयीने मुलुंडकर हैराण
पार्किंगच्‍या गैरसोयीने मुलुंडकर हैराण

पार्किंगच्‍या गैरसोयीने मुलुंडकर हैराण

sakal_logo
By

मुलुंड, ता. २६ (बातमीदार) ः मुलुंडमध्ये नागरिकांना वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. विशेष म्हणजे वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्‍या करत असल्‍याने वाहतूक कोंडीमध्‍ये भर पडत आहे. त्‍याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे पालिकेने वाहनांच्‍या पार्किंगसाठी जागा वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुलुंडमध्‍ये पूर्व व पश्चिम या दोन्‍ही भागांमध्‍ये मिळून तीन पार्किंगच्‍या जागा आहेत. त्‍यातील पूर्वेकडील पार्किंग बंद असल्‍याने केवळ दोन जागांवर अधिकृत पार्किंग उपलब्‍ध आहे. मात्र ही जागा अपुरी असल्‍याने शहरात अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. मुलुंड वाहतूक पोलिस अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करत असले, तरीही पार्किंगसाठी जागाच नसल्‍याने नागरिकांचाही नाईलाज होत आहे. त्‍यामुळे मुलुंडमधील वाहतूक समस्‍या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत असल्‍याचे पहायला मिळत आहे.

तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज
मुलुंडमधील पार्किंगची समस्‍या गंभीर असून यावर सर्व मुलुंडकरांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे, अशी भूमिका मुलुंड विकास समितीच्या अध्यक्षा मयुरा बाणावली यांनी घेतली आहे. तसेच जोपर्यंत महापालिका पार्किंगची सोय करत नाही, तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी दंड आकारू नये, अशी विनंती त्‍यांनी पत्राद्वारे पोलिसांना केली आहे. मुलुंडच्या नागरिकांनी या समस्येवर सूचना आणि निवेदन पाठवावे, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

मुलुंडमधील वाहनतळ
पूर्वेला रेल्‍वे स्‍थानकाजवळ
जलाराम बाप्‍पा मार्केट
आर मॉल

वाहनतळ बंद असल्‍याचा फटका
मुलुंड पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळ असलेले वाहनतळ तांत्रिक कारणामुळे बंद आहे. यामुळे पूर्वेमध्‍ये पार्किंगची समस्‍या वाढली आहे. मुलुंडमध्‍ये सध्‍या दोनच ठिकाणी पार्किंग होत असल्‍याने त्‍याचा फटका वाहतूक व्‍यवस्‍थलाही बसत आहे.

पार्किंग समस्या ही मानवनिर्मित असून त्यावर महापालिकेतर्फे नक्की तोडगा काढला जाईल. सद्यपरिस्थितीमध्ये दुचाकी आणि चारचाकींची संख्या जास्त आहे. सोसायट्यांमध्ये पार्किंगसाठी जागा नसतानादेखील नागरिक नवीन गाड्या खरेदी करतात परिणामी रस्त्यावर नवीन गाड्या वाढल्यामुळे वाहतुकीची समस्या उद्‌भवते. पालिका नव्याने पार्किंगसाठी जागेचा शोध घेत आहे. जेणेकरून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांनादेखील ते सोयीस्कर ठरेल.
– चक्रपाणी अल्ले, सहायक आयुक्त, टी विभाग मुलुंड

मुलुंडमध्ये पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. दररोज नवीन गाड्या रस्त्यांवर येत आहेत. सोसायट्यांमध्येदेखील वाहने पार्क करण्यासाठी जागा उरली नसून वाहनचालक नाईलाजाने आपल्या दुचाकी, चारचाकी रस्त्यावर, पदपथांवर अनधिकृतपणे पार्क करतात; परिणामी त्याचा त्रास नागरिकांना होतो. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आमच्यातर्फे कारवाई केली जाते; मात्र पार्किंगची सोय महापालिकेतर्फे करण्यात यावी, ही आमची विनंती आहे; तरच हा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल.
– संपत लोंढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
कांजूर वाहतूक विभाग

सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करावा
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्‍या वाढत आहे. नागरिक सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेचा वापर न करता स्‍वतःची वाहने वापरत असल्‍याने रस्‍त्‍यांवरील वाहनांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेचा वापर केल्‍यास रस्‍त्‍यांवरील वाहनांची संख्‍या आटोक्‍यात येईल, ज्‍यामुळे वाहतूकही अधिक सुलभ होईल, असे मत जाणकारांनी व्‍यक्‍त केले आहे.