वसई विरारमध्ये पाणी महागले

वसई विरारमध्ये पाणी महागले

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २६ : शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाण्याची टंचाई, वारंवार अनियमित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. असे असताना महापालिकेने नवीन जोडणीमागे अनामत रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पूर्वी संपूर्ण इमारतीसाठी असणारी अनामत रक्कम आता प्रत्येक सदनिकेप्रमाणे आकारली जाणार आहे. त्यामुळे नळजोडणीच्या प्रकारानुसार या अनामत रकमेत पाच हजारांपासून थेट एक लाखापर्यंतची वाढ करण्यात आली आहे. यामुळे शहरातील नवीन नळजोडणी महागली आहे.
शहरात गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. तसेच नवीन निवासी इमारतींचे बांधकाम फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या नव्याने तयार होणाऱ्या निवासी इमारतींमुळे वाढणाऱ्या लोकवस्तीला पुरेसा पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. वसई विरार शहराला सद्यस्थितीत सूर्या धामणी, पेल्हार उसगाव धरणातून पाणीपुरवठा होत आहे; तर नव्याने कार्यान्वित होणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या वर्षी पूर्ण होणार आहे. त्यामुळे नवीन नळजोडणी घेण्यासाठी नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्वी संपूर्ण एका इमारतीसाठी नळजोडणीसाठी अनामत रक्कम आकारली जात होती; पण आता महापालिकेने प्रत्येक सदनिकेमागे अनामत रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात औद्योगिक, व्यापारी, गृहसंकुल, दुग्धालय, शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, हॉस्पिटल, दवाखाने, उपाहारगृह, मॉल, कार्यालये, क्लब हाऊस, सिनेमागृह, बर्फ कारखाने, धार्मिक स्थळे, झोपडपट्टीधारक, बैठी घरे, बंगले यासाठी महापालिकेकडून पाण्याच्या वापरानुसार अनामत रक्कम आकारण्यात येते. यात उद्योगांना पिण्याच्या पाण्यासाठी ५० हजार रुपये; तर बर्फ कारखान्यांना एक लाख अनामत रक्कम मोजल्यावर पाण्याची जोडणी मिळणार आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नवघर माणिकपूर विभागप्रमुख जयराम राणे यांनी नगरविकास विभाग, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच आमदार सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिका अनामत रकमेत फेरबदल करणार का, याची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.
---------------------
पश्चिमेकडील भागात सर्वाधिक फटका
पूर्वी संपूर्ण बंगल्यामागे आकारण्यात येणारी रक्कम आता खोल्यांच्या संख्येनुसार आकारली जाणार आहे. त्यानुसार दोन खोल्या, एक दिवाण आणि स्वयंपाक घर असल्या २० हजार रुपये, तर तीन आणि त्यापेक्षा अधिक खोल्या असल्यास २५ हजार रुपये इतकी अनामत रक्कम बंगले आणि स्वतंत्र घर असणाऱ्यांना मोजावी लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका पश्चिम पट्ट्यातील नागरिकांना बसणार आहे. कारण या भागात बंगले आणि स्वतंत्र घरांची संख्या अधिक आहे.
---------------------
महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीत कोणतीही वाढ केली नाही. पूर्वीच्या ठरावाप्रमाणे आकारणी केली जात आहे. तसेच याबाबत नव्याने कोणताच प्रस्ताव तयार करण्यात आला नाही. पण नव्या योजनांचे पाणी शहराला मिळणार असल्याने नळजोडणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त तथा प्रशासक
-----------------''
सरकारी पातळीवर अधिक चौकशी केली असता पाण्याच्या नवीन नळजोडणीसाठीच अधिभार वाढविल्याचे समोर आले आहे. नळजोडणीचे नवे दर अन्यायकारक आणि अव्यावहारिक आहेत. पाणी जीवनावश्यक घटक आहे, त्यामुळे अनामत रक्कम कमी करावी, नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.
- श्रद्धा राणे, महिला संघटक, शिवसेना (ठाकरे गट)
-------------------
शहरात पाण्याची टंचाई असताना ६९ गाव पाणीपुरवठा योजना बारगळली आहे. तसेच शहरात अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा अनेक भागात होतो. अनामत रक्कम पाहता भविष्यात मुबलक पाणी मिळेल, याची शाश्वती प्रशासनाने द्यावी.
- डॉमनिका डाबरे, जनआंदोलन समिती नेत्या
-------------------
घरांसाठी अनामत रक्कम
एक खोली, एक स्वयंपाक घर- १० हजार
दिवाणखाना, खोली, एक स्वयंपाक -१५ हजार
एक दिवाणखाना, एक स्वयंपाक व एकापेक्षा अधिक खोल्या - २० हजार
-------------
सामाईक गॅलरी असलेली इमारत
एक खोली एक सदनिका -आठ हजार
दिवाणखाना, खोली, एक स्वयंपाक - १२ हजार
-------------
बैठी चाळ
शौचालय आत असल्यास - पाच हजार
बैठी चाळ शौचालय बाहेर, मातीची भिंत कौलारू घर - चार हजार
--------------
विभागवार अमानत रक्कम
औद्योगिक वसाहतीत २६ पेक्षा अधिक मनुष्यबळ कारखाने - ५० हजार
अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वसतिगृह, धार्मिक स्थळ, शाळा, महाविद्यालये - पाच हजार
विनाअनुदानित शाळा, विनाअनुदानित वसतिगृह. माध्यमिक शाळा - २५ हजार
शासकीय कार्यालये - १० हजार
परमिट रूम लॉज - ४० हजार
उपाहारगृह, हॉस्पिटल, क्लब हाऊस, बँक व अन्य संस्था - ३० हजार
दवाखाना, औद्योगिक गाळे, दुग्धालय -२० हजार
सिनेमागृह, छोटे उद्योगधंदे - २५ हजार
२६ पेक्षा अधिक मनुष्यबळ असणारे उद्योग, डेअरी - ५० हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com