
पाणी टंचाईवर तलाव खोलीकरणाची मात्रा
मोखाडा, ता. २६ (बातमीदार) : मोखाडा तालुका आणि पाणीटंचाई हे प्रतिवर्षाचे समीकरण जुळलेले आहे. उन्हाळा सुरू होताच आदिवासींना भीषण पाणीटंचाईच्या मरणयातना सोसाव्या लागतात. त्याचबरोबर पशुधनाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होतो. यामुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी धामणशेत कोशिमशेत या ग्रुप ग्रामपंचायतीमधील धामणशेत गावालगत असलेल्या तलावातील गाळ काढणे, तलावाची खोली आणि रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मोखाडा तालुक्यात दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट ओढावते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच जल जीवन योजनेतून अनेक गावांमध्ये नळयोजनेचे काम काम सुरू आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. त्यानुसार टाटा मोटर्स व बायफ यांच्या संयुक्त विद्यमानाने धामणशेत गावालगतच्या तलावातील गाळ काढणे, तलावाची खोली व रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी निकम यांनी या कामामुळे काही प्रमाणात का होईना, येथे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्यांतून ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अशा निकम यांनी व्यक्त केली आहे.
या कामात तलावाची पिचिंग व सुशोभीकरण ही कामे नरेगाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. या वेळी प्रभारी गटविकास अधिकारी कुलदीप जाधव, विस्तार अधिकारी तुषार सूर्यवंशी, ग्रामसेवक मंगेश पाटील, टाटा मोटर्सचे शैलेश माहुलीकर, बायफचे गोरक्षनाथ भोवर, पंचायत समिती सदस्य युवराज गिरंधले, सरपंच सुरेश धिंडे, पोलिस पाटील सखाराम नांदे, योगेश कोथे, धर्मराज नांदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
.....
मुबलक पाणी मिळणार
धामणशेत तलावाचे दोन मीटरपर्यंत खोलीकरण करून गाळ काढला जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात मुबलक प्रमाणात पाणीसाठा या तलावात उपलब्ध होणार आहे. धामणशेत, पाटीलपाडा, ठाकूरवाडी, पेंडक्याची वाडी यालगतच्या गावपाड्याना शेतीसाठी त्याचबरोबर पशुधनाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
...
मोखाडा : तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचे जिल्हा परिषद सदस्या सारीका निकम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.