
रिपब्लिकनचे आजपासून बेमुदत उपोषण
तुर्भे, ता २६ (बातमीदार) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने सोमवारी (ता. २७) सकाळी ११ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे पक्षाचे नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष ॲड. यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील विविध विषयांवरील मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
नवी मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी सातत्याने मोर्चे, आंदोलन करण्यात आले होते. समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या माध्यमातून ऐरोली दिवानाका चौक येथे १ जून २०२२ ला स्थळ पाहणी केली. मात्र, याबाबत स्थापत्य विभागाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी २९ जून २०२२ रोजी कोळी बांधवांचा पुतळा निविदा काढून बसवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासंदर्भात महापालिकेच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. झोपडपट्टीतील विविध समस्या, सफाई कामगारांच्या बाबतीत समान काम समान वेतन, विकी पिंगळे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या वैद्यकीय अधीक्षक व संबंधित डॉक्टरांना निलंबित अथवा त्यांची बदली करण्यात यावी, नवी मुंबई महापालिकेची मध्यवर्ती रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची सोय व एमआरआयची व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध मागण्यांवर मोर्चे, आंदोलन करून प्रश्न सुटत नसल्याने बेमुदत उपोषण करणार असल्याचे रिपब्लिकनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक सिद्राम ओहोळ व मराठा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी सांगितले.