
केतकी खोत ठरली काळाचौकीची पहिली फ्युजन फॅशन क्विन
शिवडी, ता. २६ (बातमीदार) ः आनंदी महिला प्रतिष्ठानच्या रूपाली चांदे यांनी शुक्रवारी (ता. २४) अभ्युदय नगरमधील शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात अभ्युदयनगर आणि परिसरातील पहिलाच फॅशन शो आयोजित केला होता. यात केतकी खोत काळा चौकीची पहिली ‘फ्युजन फॅशन क्विन’ ठरली. या वेळी परीक्षक म्हणून विश्वसुंदरी पूर्वी गडा आणि चित्रपट निर्माती गौरी चौधरी उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान अनेक स्थानिक कलाकारांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. नृत्यदिग्दर्शक विकी जैस्वाल, सचिन रावत यांचेही या सोहळ्यात उल्लेखनीय सहकार्य होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय आणि विदेशी संस्कृतीचे अनोखे फ्युजन असलेल्या या स्पर्धेचे कौतुक करत महिलांना घराचा उंबरठा ओलांडून भरारी घेणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच नव ऊर्जा फाऊंडेशनच्या धनश्री विचारे, गणेश गारगोटे, माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि पदाधिकारी उपस्थित होते; तर सागर सातपुते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
तूर्कीतील भूकंपग्रस्तांना सत्कर्मचा मदतीचा हात
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः तुर्कीमध्ये एकामागून एक भूकंप झाल्याने या देशाचे मोठे नुकसान झाले आहे. तेथे उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना जागतिक देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारतातूनदेखील मदतकार्य मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मुंबईतील सत्कर्म फाऊंडेशननेदेखील तुर्कीतील भूकंपग्रस्तांनासाठी मदतकार्य सुरू केले आहे. यासाठी फाऊंडेशनतर्फे ५०० ब्लँकेट, दहा हजार सेनेटरी नॅपकीन तुर्की एअरलाइन्सच्या माध्यमातून पाठवण्यात येत असल्याचे संचालक अनुज नरुला आणि संचालक दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.
ऑर्लेममध्ये ख्रिस्ती समाजाची निदर्शने
मालाड, ता. २६ (बातमीदार) ः बॉम्बे कॅथलीक सभेच्या वतीने मालाड येथील ऑर्लेममध्ये शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. अवर लेडी ऑफ लुर्ड्स चर्च येथील मदर मेरीची मूर्ती असलेल्या ग्रॉटोवर कोणी अनोळखी व्यक्तीने दगड फेकून काच तोडली होती. त्याबाबत बॉम्बे कॅथलिक सभेच्या वतीने मालाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली व त्यानंतर ऑर्लेम चर्च येथे ख्रिस्ती समाजातील पुरुष, महिला तसेच धर्मगुरूंनी या घटनेचा निषेध केला. तसेच पोलिसांनी आरोपीचा शोध लवकरात लवकर लावून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजातील मान्यवर आणि कार्यकर्ते तसेच संस्था, संघटनेचे लोक सहभागी झाले होते.