कोट्यवधींची करवसुली थकीत

कोट्यवधींची करवसुली थकीत

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६ : दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे करवसुलीत दमछाक होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपुढे यंदाचे वर्षही पाणी व घरपट्टी वसुलीसाठी आव्हानात्मक ठरत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना ४० टक्के करवसुली अद्याप शिल्लक आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्‌या ग्रामपंचायत विभागाने विशेष प्रयत्न करूनही करवसुली अपेक्षीत टक्केवारीपर्यंत पोहचू शकलेली नाही. निश्चित आकडा गाठण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शेवटचा पर्याय स्वीकारला असून होळीनिमित्ताने गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांच्या दारावर ग्रामपंचायतींचे कर्मचारी धडकणार आहेत. यातून जास्तीत जास्त कर वसुली होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण ८०९ ग्रामपंचायतींना २३१.५७ कोटी रुपये करवसुलीचे उद्दिष्टे देण्यात आले होते. यातील आतापर्यंत फक्त १४२.५१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम एक महिना उरलेला असल्याने जास्तीत जास्त वसुली करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भाग आहे. रायगड जिल्हा परिषदेने पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी आधुनिक अमृतग्राम डिजिटल करप्राणाली सुरू केली आहे. यासह नागरिकांनी स्वतःहून करभरणा करावा यासाठी काही ग्रामपंचायतींनी आकर्षक सवलती सुरू केल्या आहेत. तरीही करवसुलीचा टक्का पाहिजे तसा वाढलेला नाही. आश्‍चर्य म्‍हणजे शहरातील बड्या आसामीसह संस्थाचा कर थकविणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
अनेक ग्रामपंचायतींचा घरपट्टी हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. व्यवसाय मंदावले तर कुणाचे रोजगार गेले. त्याचा थेट परिणाम ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षीही करवसुलीअभावी ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट आहे. रोजचा खर्चाचा मेळ घालण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतनासह विकासकामावर मोठा परिणाम होत आहे.
करवसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून डिसेंबरमध्येच संबंधित नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, मात्र तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्‍यामुळे कर वसुली आकडा वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी विविध युक्त्या आखत आहेत.

मुरूडची सुमार कामगिरी
रोहा तालुक्याला १०.२ कोटी रुपयांचा लक्ष्य देण्यात आले होते. यातील ८.५ कोटी रुपयांची वसुली जानेवारीअखेरस झाली. सर्वाधिक सरासरी गाठण्यात रोहा तालुका यशस्वी झाला आहे, तर वसुलीत सर्वात पिछाडीवर मुरूड तालुका असून येथे ३१.७२ टक्केच पाणीपट्टी वसुली झाली आहे. घरपट्टी वसुलीतही मुरूड तालुका मागे आहे. या तालुक्यात ५२.२४ टक्के वसुली झाली आहे. यासह पोलादपूर, माणगाव, सुधागड-पाली हे तालुके करवसुलीत प्रगतिपथापर आहेत.

गतवर्षीचे ४६ कोटी थकीत
मार्च २०२२ नंतर घरपट्टीच्या स्वरूपात ४१.७० कोटी रुपये थकीत राहिले होते तर पाणीपट्टीचे ४.७० कोटी असे एकूण ४६.१४ कोटी रुपये येणे बाकी आहे. यासाठीही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना करदात्यांकडे फेऱ्या मारावा लागणार आहेत. ही थकबाकी नोकरी-व्यवसायानिमित्त शहराकडे गेलेल्या लोकांची आहे. मागील तीन-चार वर्षे ते गावाकडे फिरकलेच नसल्याने थकबाकी वाढत गेली. ही थकबाकी वसूल करण्यासाठी ना हरकत, विविध प्रकारचे दाखले घेण्यापूर्वी थकबाकी भरण्याची सक्ती केली जात आहे.

करवसुलीची टक्केवारी
तालुका/ पाणीपट्टी/घरपट्टी
अलिबाग/८०.३९/५९.७५
पेण/५२.४५/५६.६२
पनवेल/६०.८४/५९.४९
उरण/५१.०८/६८.९४
कर्जत/७७.९६/८२.०७
खालापूर/४८.०२/६२.३८
पाली/६६.३२/७४.८४
रोहा/८३.६७/६०.७४
मुरुड/३१.७२/५२.२४
म्हसळा/६६.०५/६८.२६
श्रीवर्धन/८१.९७/६९.१३
माणगाव/४८.९३/६३.३४
तळा/५६.६१/५७.११
महाड/५४.४५/६०.११
पोलादपुर/५५.५८/७३.८६
---
एकूण / ५८.६३/६१.८६
---

करवसुली सुलभ व्हावी यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जात असला तरी काहींची मानसिकता कर भरण्याची नसते. शहरी भागातीलही नागरिक कर भरण्यास विलंब करतात. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत जात आहे. राहिलेल्या दिवसात शिल्लक राहिलेली रक्कम जास्तीत जास्त वसूल करण्याचा प्रयत्न आहे.
- राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com