
अवैध दारू साठा जप्त
कासा, ता. २६ (बातमीदार) ः दमण बनावटीच्या दारूचे ४१ बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. चारोटी टोलच्या पुढे जलाराम मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दारू आणि साडेचार लाख रुपयांची पिकअप गाडी असा ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील, भरतेश हारूगिरे, हिरामण खोटरे, कैलास पाटील, कपिल नेमाडे यांनी केली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुन्हे वॉच पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार कपिल नेमाडे यांना दमण बनावटीची दारू बोईसर येथे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चारोटी टोलच्या पुढे जलाराम मंदिरासमोर सापळा रचन्यात आला. महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये खाकी रंगाचे बॉक्स ठेवण्यात आले होते. हे बॉक्स दमण बनावटीच्या दारूचे होते. या वेळी चालक गंगाराम जाधव याच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.