राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी

राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी

उष्माघातांच्या तक्रारींचा पारा गरम
डिहायड्रेशन, उलट्या आणि जुलाबाने त्रस्त रुग्णांमध्ये २५ टक्क्यांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरांत उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. ठाणे जिल्ह्यातही उन्हाची चांगलीच झळ जाणवत आहे. परिणामी आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मुंबईतील प्रदूषण आणि त्यात तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे राज्याबरोबरच मुंबई पालिका रुग्णालयांमध्ये डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब आणि थकवा येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उष्माघात आणि उन्हामुळे चक्कर आल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात गर्दी होत आहे.

शरीरातील पाणी कमी होणे अर्थात डिहायड्रेशन, थकवा इत्यादी तक्रारी करणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांत राज्य रुग्णालयांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याशिवाय पोटात आणि पायात पेटके येणे, तग धरण्याची क्षमता नसणे, योग्य झोप न लागणे, मळमळणे आणि इतर अनेक तक्रारी असलेले रुग्णही वाढू लागले आहेत. राज्य रुग्णालयांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून डिहायड्रेशन, थकवा, अंगदुखी, डोळ्यात आग आणि लघवी करताना जळजळ होण्याची तक्रार करणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

पालिकेच्या रुग्णालयांत डिहायड्रेशन, वाहणारे नाक, धूळ आणि घसादुखीमुळे रुग्‍ण ॲलर्जीची तक्रार करताना दिसत आहेत. आपत्कालीन परिस्थितीशिवाय दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले जात आहे. पुरसे पाणी पिण्याचा सल्लाही दिला जात आहे.

जे. जे. रुग्णालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले, की विषाणूजन्य ताप, डोकेदुखी, गॅस्ट्रो आणि घसादुखीने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ओपीडीला भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ओपीडीत येणाऱ्या ४५० नागरिकांपैकी १०० ते १५० जणांनी ताप, डोकेदुखी आणि इतर आजारांची तक्रार केली होती.

ताप तीन दिवसांपेक्षा जास्त असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. अतिसार आणि डोकेदुखीच्या रुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. तापाचे रुग्ण १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.
- डॉ. मधुकर गायकवाड, सहायक प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय

संतुलित आहारावर भर
निसर्गाच्या लहरीपणाचा माणसांच्या आरोग्‍यावर परिणाम होतो. सध्या तापमानाचा पारा वाढल्‍याने दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा बसू लागल्‍या आहेत. अशा वेळी शरीर संतुलित ठेवण्यासाठी आहारावरही विशेष लक्ष देणे गरजेचे असल्‍याचे तज्‍ज्ञ सांगतात. उन्हामुळे भूक मंदावणे, डिहायड्रेशन, उष्माघात, अॅसिडिटी, डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे, थकवा जाणवणे आदी समस्‍या उद्‌भवतात. ॠतुमानानुसार आहारात बदल केल्‍यास, प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते. दिवसभरात अधिकाधिक पाणी पिणे, व्यायाम करणे अथवा दररोज नियमितपणे योगाभ्‍यास व प्राणायाम करणे आवश्‍यक आहे.

डॉक्टरांचा सल्ला
- डिहायड्रेशन, अशक्‍तपणा, थकवा आणि चक्‍कर टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. हंगामी फळे खावी.
- संसर्गजन्य तापामुळे अंगदुखी, घसा खवखवणे, सर्दी-खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतो. तो टाळण्यासाठी हलका आहार घ्‍यावा. पचण्यास जड पदार्थ खाणे टाळावे.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी लिंबू पाणी, ग्‍लुकोज, फळांचा रस आदींचे सेवन करावे.
- उन्हामुळे त्वचा कोरडी पडते. घरातून बाहेर पडताना सुती वा हलक्‍या रंगाचे कपडे घालावे. गॉगल, टोपी-ओढणी, स्‍टोल आणि मास्कचाही वापर करावा.
- चहा, कॉफी आणि मद्यपान टाळावे. त्‍याऐवजी शहाळे, संत्री, मोसंबी, कलिंगड आणि लिंबूचा रस घ्‍यावा.
- आहारात फळे-हिरव्या भाज्‍यांना प्राधान्य द्यावे. काकडी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, बीट आदींचा आहारात समावेश करावा.
- रात्रीच्या वेळी जागरण टाळावे. पुरेशी झोप घ्‍यावी.
- उन्हाळ्यात शक्यतो मसाल्याच्या पदार्थ टाळावे. तेलकट पदार्थ वर्ज्य करा. साध्या-सात्त्विक जेवणावर भर द्या. बेकरीतील खाद्यपदार्थ वा जंक फूड टाळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com