गोवर संसर्ग कमी झाल्याने सहा केंद्र बंद

गोवर संसर्ग कमी झाल्याने सहा केंद्र बंद

मुंबई, ता. २६ : मुंबईतील गोवर संसर्ग नियंत्रणात आल्याने मुंबई महापालिकेने सहा गोवर केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उद्रेक असलेल्या वॉर्डात नजर कायम असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच सर्वेक्षण, तपासणी आणि लसीकरण सुरू असल्‍याचेही पालिकेने सांगितले.
मुंबईमध्ये गोवरचा उद्रेक नियंत्रणात आला आहे. त्‍यामुळे पालिकेने गोवरसाठी सुरू केलेल्‍या केंद्रांपैकी सहा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्‍ये सी वॉर्डमधील पांजरपोळ आरोग्य केंद्र, एच पूर्व वॉर्डातील शांतीनगर आरोग्य केंद्र, के पूर्व वॉर्डातील सर्वोदय नगर आरोग्य केंद्र, पी उत्तर वॉर्डातील आप्पापाडा आरोग्य केंद्र, एल वॉर्डातील हिमालया आरोग्य केंद्र, तर एल वॉर्डातील नेहरू नगर आरोग्य केंद्र यांचा समावेश आहे. गोवर मृत्यू संशोधन समितीच्या म्हणण्यानुसार मुंबई महापालिका क्षेत्रात २०२२ या वर्षांत ११ मृत्यू झाले असून सुरू असलेल्‍या २०२३ या वर्षात ४ मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. दरम्‍यान, गोवर आटोक्‍यात आल्‍याचे दिसून येत असले तरीही पालिकेकडून होत असलेले सर्वेक्षण, तपासणी आणि लसीकरण सुरू असल्‍याचेही पालिकेने स्‍पष्‍ट केले आहे.
मुंबईत जानेवारीमध्ये ३५ लाख ८० हजार २८४ घरांचे आतापर्यंत गोवरसाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ताप व पुरळ असलेले ३७८ रुग्ण आढळले. ऑक्टोबरच्या शेवटी गोवर संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे महापालिकेने ज्या ठिकाणी संसर्गित रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून आले तेथे त्वरित लसीकरण मोहिमेला सुरुवात केली.
९ महिने ते पाच वर्षे वयोगटामधील ८२ आरोग्य केंद्रांतील एकूण २ लाख ३२ हजार १५९ बालकांपैकी १ लाख ६८ हजार ३८६ म्हणजे ७२.५३ टक्के बालकांना आतापर्यंत गोवर रुबेला लशीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे; तर सहा महिने ते नऊ महिने या वयोगटामध्ये २३ आरोग्य केंद्रातील ज्या ठिकाणी नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे अशा आरोग्य केंद्रातील एकूण ५११४ बालकांपैकी ३८४४ म्हणजे ७५.१७ टक्के बालकांना आजपर्यंत गोवर रुबेला लशीची मात्रा देण्यात आली आहे.

या भागात आजही गोवर
गोवर उद्रेक असलेले शहरात आठ विभाग असून यात ए, सी, ई, डी, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी उत्तर, जी दक्षिण हे वॉर्ड मोडतात.
पश्चिम उपनगरात सात वॉर्डांत गोवर उद्रेक असून एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण असे हे वॉर्ड आहेत.
पूर्व उपनगरात पाच वॉर्डांत गोवर उद्रेक असून यात एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन आणि एस या वॉर्डात सक्रिय गोवर रुग्ण आहेत.

मुंबईतील आकडेवारी
३५ लाख घरांचे जानेवारीत सर्वेक्षण
३७८ रुग्ण ताप व पुरळ असलेले
८२ आरोग्य केंद्रातील
७२.५३ टक्के बालकांना गोवर रुबेला लशीची अतिरिक्त मात्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com