सिडकोची पाणी समस्येवर मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोची पाणी समस्येवर मात
सिडकोची पाणी समस्येवर मात

सिडकोची पाणी समस्येवर मात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ ः हिवाळा संपल्यानंतर वसाहतींना भेडसावणारी पाणी समस्या सोडवण्यासाठी सिडकोने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, तळोजा, खारघर, उलवे, द्रोणागिरी या वसाहतींची पाणी समस्या सोडवण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेत नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. टाटा संस्‍थेने सुचवलेल्या सूचनानंतर हेटवणे धरणातील पाणी क्षमता वाढवणे, बूस्टर पंप बसवणे, नवीन जलकुंभ उभारणे, जलवाहिन्यांची गळती आणि चोरी रोखणे आदी विविध उपाय केल्यामुळे सिडको वसाहतींमधील पाण्याबाबत उद्भवणारे प्रश्न कमी झाले आहेत.
नवी मुंबई महापालिकेला सर्व नोड हस्तांतरित केल्यानंतर सिडकोने दक्षिण नवी मुंबईच्या विकासासोबत पायाभूत सुविधांकडे लक्ष केंद्रित केले आहे. या भागातील मोकळ्या भूखंडांवर उभ्या राहणाऱ्या सिडको वसाहती, रस्ते, पदपथ, गटारे, मलनिस्सारण केंद्र आदी सुविधा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची तजवीज सिडको प्रशासनाकडून केली जात आहे. त्याकरिता सिडकोने टाटासारख्या नामांकित संस्थेकडून पाण्याच्या आराखडा तयार करून घेत त्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. संस्थेच्या मदतीने केलेल्या नियोजनाचा एक भाग म्हणून २२ जूनला केलेल्या प्रेशर कंड्युटच्या कामांची अंमलबजावणीतून सिडकोने हेटवणे धरणाच्या आउटलेटवर १५० एमएलडी वरून १८० एमएलडीपर्यंत अतिरिक्त पाणी काढण्यासाठी दबाव नलिका काम सुरू केले. त्यामुळे सिडको परिसराला ३० एमएलडी पाणीपुरवठा वाढला आहे. या कामामुळे संपूर्ण सिडको कार्यक्षेत्रातील नोड्समधील पाण्याची तूट भरून काढण्याची सोय झाली आहे.
तळोजा येथे इनलाइन बूस्टिंग सिस्टमची स्थापना करण्यात आली आहे. तळोजा नोडमधील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी तळोजा टप्पा-१ आणि टप्पा-२ येथे दोन ५ एमएलडी क्षमता असणारे जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे. खारघरमध्ये वारंवार निर्माण होणारा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी येथे समन्यायिक पाणीपुरवठ्यासाठी, सिडकोने खारघर सेक्टर ११, सेक्टर १८ आणि सेक्टर ३० येथे एचएसआर कार्यान्वित केले आहेत. बहुतेक सेक्टरमध्ये गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. कळंबोली आणि पनवेल नोड्सवरील पाणीपुरवठ्याचा दाब सुधारण्यासाठी नवीन पनवेलमधील पोदी टॅपिंग पॉइंट, कळंबोली आणि माथेरान टॅपिंग पॉइंटवर बूस्टर पंप बसवण्यात आले आहेत. उलवे भागात सततच्या देखरेख पथकाद्वारे जलवाहिन्यांवरील गळती आणि पाणी चोरीच्या घटनांना पूर्णपणे आळा बसला आहे. तसेच ६०० मिमी व्यासाच्या मोठ्या जलवाहिनीमुळे उलवे येथील सेक्टर १६ आणि १७ येथील पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली आहे.


विविध नोडसाठी पाण्याचे नियोजन
सिडकोच्या हद्दीतील विविध नोड्समधील पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी सुमारे ८.३० किलोमीटर पर्यंतची डीआय पाइप बदलली आहेत. पाणीपुरवठ्याचे सतत निरीक्षण करून आणि नवी मुंबई महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी सारख्या विविध भागधारकांशी समन्वय साधला जात आहे. त्याची फलश्रुती म्हणून नवी मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा सरासरीपेक्षा वाढला आहे. ३८-४० एमएलडी इतके सरासरी पाणी खारघरला व कामोठे येथे ४५ एमएलडी नियमित देखरेखीद्वारे पुरवला जात आहे. एमजेपीमधून पाणी पुरवठा ७० एमएलडी वरून आता ७५ एमएलडीपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच नोडमध्ये येणाऱ्या गावांमध्ये १००% मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाण्याच्या टॅंकरच्या प्रमाणात ९० टक्क्यांनी घट झाली आहे.
---------------------------------