न्यूज नवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूज नवी
न्यूज नवी

न्यूज नवी

sakal_logo
By

फुग्यांचा किंवा पिशव्यांचा मारा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
वाशी, ता. २६ (बातमीदार) : होळी व धुलिवंदनला आठवडा शिल्लक असताना इमारतीच्या छतावरून रस्त्यावर रहदारी करणाऱ्या नागरिकांवर विशेषतः महिलांवर पाण्याने भरलेल्या फुग्यांचा किंवा पिशव्यांचा वर्षाव सुरू झाला आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोबतच धावत्या रेल्वे आणि बसमधील प्रवाशांवर झोपडपट्टी भागातून पिशव्या व फुगे फेकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. उनाड मुलांकडून मारण्यात येणाऱ्या पाण्याच्या पिशव्या व फुग्यांमुळे अनेक जण जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. कोपरखैरणे परिसरात काही वर्षांपूर्वी तरुणींवर फुगे मारण्याच्या घटनेतून दंगल उसळली होती. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अश्याप्रकारे पिशव्यांचा मारा करणाऱ्या मुलांवर नवी मुंबई पोलिसांची करडी नजर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान साध्या वेशातील पोलिस फुगे व पिशव्या मारणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत, तर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस नेमण्यात आल्या आहेत. होळी व धुलिवंदनच्या दिवशी मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे मद्यापींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नवी मुंबईचे पोलिस परिमंडळ-१चे, उप-आयुक्त विवेक पानसारे यांनी सांगितले.

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
नवीन पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का रोडजवळील एका झाडाच्या फांदीला एका अज्ञाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या मृत इसमाचे अंदाजे वय ४० वर्षे, रंग सावळा, उंची ५ फूट ७ इंच, असून पांढरा-निळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट परिधान केलेला आहे. तसेच छातीवर एम. एस. असे गोंदलेले आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांनी केले आहे.

मालगाडीखाली येऊन तरुणाचा मृत्यू
नवीन पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : पनवेल रेल्वेस्थानकावर मालगाडी आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पनवेल रेल्वे पोलिस या मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या तरुणाचे अंदाजे वय ३० वर्षे असून उंची ४ फूट ४ इंच, अंगाने सडपातळ, रंगाने काळा- सावळा, चेहरा उभट, नाक सरळ अशी शरीरयष्टी आहे. मृताच्या उजव्या हातावर कोपऱ्याच्या खाली इंग्रजीमध्ये सुरभि असे गोंदलेले आहे. तसेच त्याने अंगात निळ्या व पांढऱ्या रंगाचा मोठ्या चेक्स असलेला बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची फुलपॅन्ट परिधान केली होती. या इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलिसांशी संर्पक साधण्याचे आवाहन पोलिस हवालादार एस. सी. इंगवले यांनी केले आहे.

खारघर रेल्वेस्थानक अनधिकृत पार्किंगवर वाहतूक शाखेची कारवाई
नवीन पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : खारघर रेल्वेस्थानक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. खारघर वाहतूक शाखा आणि वाहतूक पोलिस उपायुक्त यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत १०५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. खारघर रेल्वेस्थानकापासून सेक्टर-८ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने अनधिकृत उभी केली जात आहेत. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत हजारो रुपयांचा दंड जमा झाला आहे. ई-चलानद्वारे ही कारवाई करण्यात आली. विशेष मोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिली.