
भरधाव डंपरची मासळीच्या टेम्पोला धडक
मनोर, ता. २६ (बातमीदार) : बोईसर-चिल्हार रस्त्यावरील मान गावाच्या हद्दीत भरधाव वेगातील डंपरने मासळी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून टेम्पो मधील मासे आणि बर्फ रस्त्यावर पडून वाया गेल्याने मासळी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघातामुळे चिल्हार बोईसर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दुपारी मान गावाच्या हद्दीत भरधाव वेगातील डंपरने मासळी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक आणि इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. सुरज अजय दौडा (वय.१७), अजय दौडा(वय.४५)अखिलेश चौधरी,(वय.२४) अशी जखमींची नावे आहेत. या जखमींना उपचारासाठी बेटेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर डंपरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला.
अपघातामुळे टेम्पोमधील मासे आणि बर्फ रस्त्यावर पडून मासे विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे चिल्हार बोईसर रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अपघाता नंतर बोईसर पोलिस व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक पूर्ववत केली.