
नवी मुंबईकरांनी अनुभवला कुस्तीची थरार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ ः महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार चांगला रंगला आहे. घणसोलीतील महापालिकेच्या शाळेवर प्रकाशझोतात खेळवल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी होत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने नवी मुंबई महापालिकेतर्फे आयोजित ‘नवी मुंबई महापालिका केसरी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये ७४ ते १०० किलो वजनी गटात राज्यस्तरीय महापालिका चषक एक लाख व पारितोषिक रकमेसह प्रदान केला जात आहे. तसेच ५५ ते ६५ किलो वजनी गटात राज्यस्तर युवक गट असून, ६५ ते ७३ किलो वजनी गटात राज्यस्तरीय स्पर्धेकरिता खेळविला जात आहे. ५५ ते ६० किलो वजनी गटात कोकण विभागीय स्तरावरील असून ५५ ते ६५ किलो वजनी गट नवी मुंबई महापालिका क्षेत्रस्तरावरील कुस्तीगीरांसाठी आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिका क्षेत्र स्तरावर ४० ते ५० किलो वजनी गट हा चौदा वर्षाआतील वजनी गटाचा समावेश केला आहे. या स्पर्धेचे आणखी विशेष म्हणजे समाजाच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिला कुस्ती क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहे. त्या दृष्टीने महिला कुस्तीगीरांकरता ५० ते ५५ किलो वजनाचा कोकण विभागीय महिला गट आणि ५५ ते ६५ किलो वजनाचा राज्यस्तरीय महिला गटाचा समावेश केला आहे.
ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते स्पर्धांचा शुभारंभ झाला. नवी मुंबईमध्ये अनेक चांगले कुस्तीगीर असून त्यांच्या करिता पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने कुस्तीच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्याच्या सूचना यावेळी नाईक यांनी केल्या.
चार लाखांची बक्षिसे
प्रत्येक गटातील विजेत्यांना भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. एकूण रुपये चार लाख रकमेहून अधिक पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेत राज्यभरातील २५० हून अधिक कुस्तीगीर सहभागी झाले आहेत. अत्यंत चुरशीच्या कुस्त्या बघण्यासाठी घणसोलीसह नवी मुंबईतील इतरही भागातून तसेच ठाणे, रायगड जिल्ह्यासह राज्यातील इतर भागांतून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.