रिक्षा चालकांची मुजोर वागणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा चालकांची मुजोर वागणूक
रिक्षा चालकांची मुजोर वागणूक

रिक्षा चालकांची मुजोर वागणूक

sakal_logo
By

जुईनगर, ता. २६ (बातमीदार) ः नवी मुंबईतील रिक्षाचालक आणि परिवहन सेवेचे निरीक्षक-चालक यांच्यात नेहमीच खटके उडत असल्याचे दिसत आहे. रिक्षाचालकाने चालकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटनाही अनेकदा घडली आहे. त्यामुळे नेरूळमधील रेल्वेस्थानक आवार रिक्षाचालकांच्या विळख्यातून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी चालकांसह प्रवासी करत आहेत.

रेल्वे स्थानकाबाहेर असलेले अधिकृत रिक्षा स्टॅण्ड सोडून परिवहन सेवेच्या बस क्र. १७ स्थानकामध्येच रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. रिक्षाचालक थेट बसच्या समोर आपली रिक्षा उभी करतात. बसची वेळ झाल्यानंतर बस बाहेर काढताना रिक्षा पुढे घेण्याची विनंती केली तरी ती बाजूला घेण्यास रिक्षाचालक नकार देतात. उलट बसचालकाशीच अर्वाच्च भाषेत हुज्जत घालण्याचा प्रकार अनेकदा घडत आहे. बऱ्याचदा बसचालकाला जिवे मारण्याची धमकीही रिक्षाचालकांकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या परिसरात पोलिस चौकी उभारावी, पोलिसांचे गस्ती पथक तैनात करावे, अशा मागण्या करण्यात येत आहेत.

त्याचप्रमाणे नेरूळ रेल्वेस्थानक पूर्वेला असलेला अधिकृत रिक्षा स्टँड सोडून उलवेकडे जाणारे रिक्षाचालक रेल्वे प्रवाशांच्या हक्काच्या फुटपाथवर आणि त्यालगत असणाऱ्या रस्त्यावर रिक्षा उभ्या करतात. तिथेच प्रवाशांना रिक्षात कोंबतात. सदर रस्ता लहान असल्याने बस चालकांना दहा मीटर लांब बस बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. रिक्षाच्या दुहेरी रांगेमुळे बस आणि रिक्षाच्या मध्ये एखादा प्रवासी, महिला वा बालक अडकला तर त्यांचा जीवही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. इथे असलेल्या बस वाहतूक निरीक्षकालाही मुजोर रिक्षाचालक जुमानत नसल्याचे व्यथित होऊन एका बस वाहतूक निरीक्षकाने सांगितले.
------------------
प्रवासी आणि परिवहन उपक्रमाच्या तक्रारी आल्यावर आम्ही वेळोवेळी कारवाई करतो. नेरूळ रेल्वेस्थानक (पूर्व) परिसरात रिक्षाचालकांनी बेकायदेशीर रिक्षा उभ्या केल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश त्वरित देतो.
- नितीन गीते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुर्भे पोलिस वाहतूक विभाग