नवी मुंबईत हिंदुत्तवाद्यांचा मोर्चा

नवी मुंबईत हिंदुत्तवाद्यांचा मोर्चा

वाशी, ता. २६ (बातमीदार) ः कथित लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लॅण्ड जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आज (ता.२६) हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात एकूण सोळा हिंदुत्ववादी संघटना सामील झाल्या होत्या. यात भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील, रामचंद्र घरत, सुधाकर सोनावणे, अनंत सुतार, सतीश निकम, माधुरी सुतार आदी सहभागी झाले होते.

कोपरखैरणे येथील ब्ल्यू डायमंड चौक कोपरी गावापासून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत या वेळी मिरवणूक काढण्यात आली. मोर्चात सोळा हिंदुत्ववादी संघटना सामील झाल्या होत्या. तसेच वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळही सामील झाले होते. शहरातील स्त्री-पुरुष आपापल्या लहान मुलांना घेऊन या रॅलीत सामील झाले होते. या वेळी मोर्चेकऱ्यांनी ‘जय श्रीराम’सह ‘जय शिवराय’च्या घोषणाही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचा समारोप झाला. या वेळी लव्ह जिहादला कथितरित्या बळी पडलेल्या तरुणींना मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हिंदूंनी एकसंध राहण्याची शपथ घेण्यात आली. तसेच हनुमान चालिसा पठण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला.
------
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी जिहादींना देऊ नका
आतंकवादाचे मूळ कनेक्शन हे लव्ह जिहाद व लॅण्ड जिहाद आहे. आज महाराष्ट्रासह नवी मुंबईत लव्ह जिहादच्या घटना समोर येत आहेत. अनेक जमिनी बळकावून त्याठिकाणी मशिदी बांधल्या जात आहेत. सर्व हिंदूंनी लव्ह जिहाद, धर्मांतर व लॅण्ड जिहाद विरोधी कायदा लागू करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे.
- काजल हिंदुस्थानी, हिंदू प्रचारक
--------
मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न केले जात आहे. यानंतर धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधातील कायदा लवकरात लवकर सरकारने केला पाहिजे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी टाकून त्यांना कमजोर केले जात आहे. हे सर्व थांबले पाहिजे.
- गणेश नाईक, आमदार
----
हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नका
लव्ह जिहाद विरोधात आजचा हा जनजागरण मोर्चा आहे. युवा पिढीमध्ये कारस्थान रचून अमली पदार्थांचा प्रचार केला जातो आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. भारतीयांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे.
- संदीप नाईक, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com