भिवंडीत नाट्यगृहाच्‍या दुरुस्‍तीला ‘मुहुर्त’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत नाट्यगृहाच्‍या दुरुस्‍तीला ‘मुहुर्त’
भिवंडीत नाट्यगृहाच्‍या दुरुस्‍तीला ‘मुहुर्त’

भिवंडीत नाट्यगृहाच्‍या दुरुस्‍तीला ‘मुहुर्त’

sakal_logo
By

भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन हे शहरातील प्रमुख सांस्कृतिक केंद्रस्थान असल्याने शहरातील कलाकार, साहित्यिक आणि कलाप्रेमी नागरिकांचे प्रेरणास्थान बनले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून हे भव्य नाट्यगृह बंद होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष बाब म्हणून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने मंजूर केलेल्या निधीतून या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार महेश चौगुले यांनी दुरुस्‍ती कामाचा शुभारंभ केला.
भिवंडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी १९९६ मध्‍ये स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह हे जिल्ह्यात जास्त आसन संख्या असलेले भव्य नाट्यमंदिर बनविण्यात आले; परंतु या नाट्यगृहाचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्यासाठी बराच अवधी लागला. त्यामुळे नेहमी नाट्यकलाकारांच्या वाहनांना अरुंद रस्ते व रस्त्यावरील अतिक्रमणातून वाट काढीत नाट्यगृहापर्यंत जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्‍यात येत होती. या नाट्यगृहाचा शहरातील शाळा-महाविद्यालय यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह सभा, संमेलन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अधिक उपयोगात वापर केला जात होता. साहित्यिक कार्यक्रमांसह सलग बारा तासांचे भिवंडी साहित्य संमेलनदेखील याच सभागृहात पार पडले. मागील चार-पाच वर्षांपासून हे नाट्यगृह बंद करण्यात आल्याने विविध कलांच्या क्षेत्रातील कलाकारांना आपली कला सादर करता येत नव्हती. त्यामुळे कलाकारांसह भिवंडीतील कलाप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण
आर्थिक निधीअभावी नाट्यगृहाची वाताहत झाली. नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत दहा कोटी रुपये खर्चास मान्यता दिली. त्यानंतर निविदाही निघाल्या; मात्र तांत्रिक अडचणींचे कारण देत नाट्यगृहाच्या दुरुस्तीस मुहूर्त मिळत नव्‍हता. नवीन डीआरएस रेट नुसार जादा चार कोटी रुपये मंजूर केल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते करण्‍यात आला. याप्रसंगी महापालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी आणि शहरातील नाट्यप्रेमी उपस्थित होते.