हापूस आंब्याचा बाजारात बोलबाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हापूस आंब्याचा बाजारात बोलबाला
हापूस आंब्याचा बाजारात बोलबाला

हापूस आंब्याचा बाजारात बोलबाला

sakal_logo
By

वाशी, ता. २७ (बातमीदार) ः आंब्यासाठी सर्वांत मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाशीतील घाऊक फळ बाजारात सध्या आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. घाऊक फळ बाजारात दररोज सात ते आठ हजार पेट्यांची आवक होत असली तरी हापूस आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. त्यामुळे १० मार्चपासून कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल झाल्यानंतरच दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
डिसेंबरपासूनच सर्वांना हापूस आंब्याची आस लागते. गेल्या काही वर्षांपासून याच महिन्यात हापूस आंबा बाजारात दाखल होतो. सुरुवातीच्या काळात आंब्याला नेहमीच चांगला दर मिळतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हापूसची चव चाखण्यासाठी नेहमीच प्रतीक्षा करावी लागते. अगदी एप्रिलमध्ये हंगाम संपता संपता हापूस आंब्याचे दर खाली येतात. मात्र, यंदा झाडाला लागलेल्या आंब्यांची स्थिती पाहता, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आवक वाढल्यावर दर कमी होऊन हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, अशी शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.
--------------------------------------
सध्या हापूसच्या पाच ते सात डझन आंब्याच्या पेटीचा दर फळाच्या आकारानुसार तीन ते सहा हजार इतका आहे. आकाराने मोठ्या असणाऱ्या आंब्याच्या पेटीला सात हजारांचाही दर मिळत आहे. मात्र, हा दर सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे मार्चमध्येच आवक वाढल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे.
-शिवाजीराव चव्हाण, आंबा विक्रेता, एपीएमसी