जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचे ठाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचे ठाण
जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचे ठाण

जिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचे ठाण

sakal_logo
By

अलिबाग, ता. २७ (बातमीदार)ः जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधार असलेले अलिबागचे जिल्हा रुग्णालय सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित असतानाच रुग्णालयाच्या स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरून वाहणाऱ्या सांडपाण्यासोबत रुग्णालयाच्या इमारतीला झुडपांनी घातलेल्या विळख्याने जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता ठाण मांडून असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी अलिबागमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. ३८ वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीची अवस्था सध्या बिकट झाली आहे. इमारतीची वारंवार डागडुजी करूनदेखील दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे २५० खाटांचे हे रुग्णालय सध्या विविध समस्यांचे आगार बनले आहे. इमारतीमध्ये सांडपाण्याच्या पाईपला गळती लागल्याने रस्त्यावर सांडपाणी पसरले आहे. त्यामुळे रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना नाक दाबून रुग्णालयात यावे लागत आहे. तसेच रुग्णालयाच्या बाजूला लहान मुलांवर उपचारासाठी सुसज्ज असे केंद्र आहे. मात्र, या केंद्राला गवत, झुडपांनी विळखा घातला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत लहान मुलांना घेऊन जाताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
-------------------------------------
एजन्सीवर कोट्यवधीची उधळपट्टी
रुग्णालय तसेच परिसराच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून एका एजन्सीला नेमण्यात आले आहे; परंतु प्रत्यक्षात स्वच्छतेच्या अनुषंगाने कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूला रुग्णालयातील कपडे धुण्यासाठी वॉशिंग सेंटर आहे, पण कपड्यांची ने-आण करण्यासाठी रस्ता नसल्याने इमारतीच्या मागील बाजूने कपड्यांचे गाठोडे टाकून वॉशिंग सेंटरमध्ये पाठवले जातात. पण दिवसभर एकाच ठिकाणी कपड्यांचे गाठोडे पडून असल्याने प्रश्न उपस्थित होत आहे.
ः----------------------------------------------
जिल्हा रुग्णालयातील मुख्य सांडपाण्याच्या टाकीला गळती आहे. याबाबत नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे; परंतु कार्यवाही झालेली नाही. तसेच परिसराच्या स्वच्छतेबाबतही संबंधित यंत्रणेला कळवले आहे.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय