सूर ‘निरागस’ हो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर ‘निरागस’ हो!
सूर ‘निरागस’ हो!

सूर ‘निरागस’ हो!

sakal_logo
By

कलेला वयाची मर्यादा नसते, असे म्‍हटले जाते. गेल्या सात वर्षांपासून प्रसाद आजरेकर हे वसंत विहार क्लब, ठाणे येथे तबला वाजवायला शिकवतात. या तबला शिकवणीमध्ये चार-पाच वर्षांपासूनची मुले शास्‍त्रोक्‍त शिक्षण घेत आहेत. ही सर्वच लहान मुले आवडीने तबला वाजवतात. कुटुंबाच्या संगीत परंपरेने प्रेरित झालेल्या प्रसाद आजरेकर यांनी तालवाद्य वादनाची आवड त्यांच्या कारकिर्दीत यशस्वीपणे बदलली आहे.

प्रसाद यांनी तबला विषयात संगीत अलंकार पदवी (पदव्युत्तर पदवी समतुल्य) यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. या परीक्षेत त्यांनी संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी त्यांना अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाने पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांनी ‘काल तपस्या’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे; ज्यामध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील एक मुख्य घटक आणि काल म्हणजे कालचक्र यांच्यातील संबंध अतिशय चांगल्याप्रकारे मांडला आहे.
-----------------------------
चिमुकल्‍या राघवीचे कौतुक
राघवी राजन कब्रे ही शिशुवर्गात शिकणारी छोटी चिमुकली प्रसाद आजरेकर यांच्‍याकडे वर्षभरापासून तबला वादनाचे शास्‍त्रोक्‍त शिक्षण घेत आहे. राघवी ही वसंत विहार विद्यालयात शिकते. घरात संगीताची विशेष परंपरा नसली तरी लहानपणापासून तिला तबला वादनाची प्रचंड आवड आहे. एखादे गाणे कानावर पडले की तिचे हात आपोआपच थिरकायला लागतात. तिची ही आवड पाहून पालकांनी तिला अलीकडेच नवीन तबला आणि डग्‍गा दिला आहे. तिचे वय अवघे साडेचार वर्षे असले तरी तिची तबला वादनाची आवड पाहून आजरेकर यांनी तिला तबला शिकवणी वर्गात प्रवेश दिला. अभ्‍यासातही हुशार असणारी राघवी विविध लोकप्रिय गाण्यांवर तबला वादनही अतिशय आवडीने करते. राघवीला तबला वादनाचे उत्तम मार्गदर्शन लाभत असून, गेल्‍या काही महिन्‍यांत ती अतिशय कुशलतेने तबला वाजवायला शिकल्‍याचे तिची आई रेवा कब्रे यांनी सांगितले.
--------------------------------------------
तबला वाजवायला मला पूर्वीपासूनच आवडते. मी तबला वाजवायला शिकत आहे आणि आम्हाला उत्तम मार्गदर्शन लाभत आहे. त्‍यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या दोन परीक्षा मी उत्तीर्ण केल्या आहेत.
- आदित्य पाटील, विद्यार्थी