रायगडातून लांब पल्ल्याच्या ४२ बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडातून लांब पल्ल्याच्या ४२ बस
रायगडातून लांब पल्ल्याच्या ४२ बस

रायगडातून लांब पल्ल्याच्या ४२ बस

sakal_logo
By

अलिबाग, ता.२७ (बातमीदार)ः अबाल वृध्दांपासून सर्वांच्याच आवडीच्या होळी सणाची आत्तापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोकणवासियांसाठी हा सण अधिक महत्त्वाचा असल्याने गावी जाण्याचे बेत चाकरमान्यांकडून आखले जात आहेत. याच अनुषंगाने मुंबई, पुणे, बोरीवली, ठाणे येथे नोकरी व्यवसायानिमित्त असणाऱ्या चाकरमान्यांसाठी रायगड एसटी महामंडळाकडून लांब पल्ल्याच्या ४२ बस सोडल्या जाणार आहेत. तसेच यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकात आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
जिल्ह्यामध्ये होळी सहा मार्च तर धूलिवंदन ७ मार्च रोजी आहे. हा सण कुटुंबीयांसमवेत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काहींनी एसटीतून तर काहींनी खासगी वाहनांमधून गावी जाण्याची तयारी केली आहे. होळीच्या दोन दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळ रायगड विभागाने तीन ते १२ मार्च या कालावधीत जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत व माणगाव आगारातील आरक्षण कक्षामध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्था केली आहे. मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी ठाणे-महाड, बोरिवली -महाड, नालासोपारा- महाड, मुंबई - तळा, वाशी - श्रीवर्धन, भांडूप - बोर्ली - श्रीवर्धन, चिंचवड - फौजी आंबवडे या बसेस सोडल्या जाणार आहेत. होळी, धुळीवंदनानंतर सुट्टी संपल्यावर परतीच्या मार्गावर असणाऱ्या प्रवाशांसाठी पोलादपूर- ठाणे, महाड - बोरिवली, महाड - मुंबई, श्रीवर्धन- नालासोपारा, श्रीवर्धन - मुंबई , श्रीवर्धन - बोरिवली, मुरुड - मुंबई, मुरुड - नालासोपारा, तळा - नालासोपारा, श्रीवर्धन- मुंबई, महाड- बोरिवली, महाड - ठाणे, मुरुड - विठ्ठलवाडी, फौजी आंबवडे - चिंचवड, पाली - बोरिवली अशा ४२ एसटी बसेस पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
---------------------
होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे आदी मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बस सुरु केल्या आहेत. त्याची बुकिंगची व्यवस्था आगारात केली आहे. तसेच परतीच्या मार्गावर देखील जादा बसचे नियोजन केले आहे.
-दीपक घोडे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड विभाग