यशवंत मोरे यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे

यशवंत मोरे यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे

वाडा, ता. २७ (बातमीदार) : कोयना धरणामुळे पुनर्वसन झालेल्या वाडा तालुक्यातील उचाट या गावाने जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून लौकिक मिळवला आहे. त्यासाठी यशवंत मोरे यांचे अथक परिश्रम आणि गावात समविचारी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन निःस्वार्थी भावनेने केलेले सर्व योगदान समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे गौरवोद्गार मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. अरुण सावंत यांनी काढले.
कोयना क्षत्रिय मराठा समाजसेवा संघाकडून यशवंत गोपाळ मोरे यांना शिक्षणमहर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त उचाट शिक्षण संस्था, अस्पी विद्यालय व ना. आ. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय आणि अस्पी चिल्ड्रन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत मोरे यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सावंत बोलत होते. डॉ. सावंत यांनी शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार, स्पर्धेच्या युगातील आव्हाने आणि शिक्षण क्रांती कशी झाली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.
या वेळी कोयना पुनर्वसाहत सेवासंघाचे माजी अध्यक्ष बळीराम शिंदे, समाजसेवक रामूकाका, कुडूस विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पाटील, माजी मुख्याध्यापक बराटे, के. एल. पाटील, उचाटचे सरपंच, उपसरपंच, संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक, परिसरातील निमंत्रित मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन शिक्षक एन. जे. पाटील यांनी केले.

-----------------
चित्रफीत, पुस्तक प्रकाशन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर होते. त्यांनी यशवंत मोरे हे दूरदृष्टी असलेले ध्येयवादी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान मोरे यांचा जीवनपट उलगडणारी चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच शाळेचे कलाशिक्षक विजय जोगमार्गे यांनी यशवंत मोरे यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजकांतर्फे सत्कारमूर्ती मोरे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शनात दियान गायकर व शुभम पाटील यांनी सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्यांचा डॉ. सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com