पुलाअभावी धोकादायक प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुलाअभावी धोकादायक प्रवास
पुलाअभावी धोकादायक प्रवास

पुलाअभावी धोकादायक प्रवास

sakal_logo
By

महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. २८ : डहाणू तालुक्यातील कोसेसरी भवाडी येथील नागरिकांना आजही जीव धोक्यात घालून सूर्या नदीतून प्रवास करावा लागत आहे. येथील ग्रामस्थांना नदी पार करण्यासाठी लाकडी होडीचा आधार घ्यावा लागतो; पण या होडीतून आजारी माणसे, वृद्धांना रुग्णालयात नेताना मोठा त्रास होत आहे. त्याकरिता या नदीवर पूल बांधून मिळावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच गावात दळणवळणाची पुरेशी साधने नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत.
डहाणू तालुक्यात कोसेसरी गावाजवळ सूर्या नदी वाहते. ही सूर्या नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. कोसेसरी भवाडी आणि लगतच्या गावांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी कासा येथे यावे लागते. शाळेत जाण्यासाठी या मुलांना अशा लाकडी तराफ्यात किंवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या नदीवर पूल व्हावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पण, याकडे कुणीच लक्ष दिले नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
कोसेसरी भवाडी येथील ग्रामस्थांना कासा किंवा तलवाडा येथे येण्यासाठी दुसरीकडून १८ ते २० किलोमीटर वळसा घालून यावे लागते. पण तेथून प्रवासी वाहनांची संख्या खुप कमी आहे. तसेच या प्रवासासाठी भाडे आणि वेळ देखील जास्त लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी नदी पात्रातून प्रवास करतात. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा प्रवास अशाच प्रकारे सुरु आहे. त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
....
आदिवासी विकासमंत्र्यांना पत्र
ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केल्याने जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी या भागात भेट दिली. तेव्हा प्रशासनाने पादचारी पूल बांधण्यास मान्यता दिली; पण या गावाच्या परिसराची जवळपास पन्नास हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना कायमस्वरूपी एक वाहन जाईल, इतक्या क्षमतेचा पूल उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसे पत्र आदिवासी विकासमंत्र्यांना दिले आहे.
...
प्राथमिक शिक्षण आमच्या गावात मिळते; पण त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. यासाठी विद्यार्थ्यांना नदीतून लहान दोर बांधलेल्या लाकडी होडीतून जीवघेणा प्रवास करवा लागतो. आम्ही ग्रामस्थ अनेक वर्षांपासून येथे पूल तयार करावा, अशी मागणी करत आहोत.
- रमेश सप्टा, ग्रामस्थ
...
कोसेसरी भवाडी येथील शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना कासा येथे येण्यासाठी दररोज या सूर्या नदीतून लाकडी होडीचा उपयोग करून जावे लागते. येथे कायमस्वरूपी पूल बांधावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच या परिसरातील अनेक ग्रामपंचायतीतर्फे ठराव दिलेले आहेत. सध्या पादचारी पूल मंजूर झाला असून आम्ही निदान एकेरी वाहन जाईल, असा पूल मिळावा, अशी मागणी करीत आहोत.
- शैलेश करमोडा, जिल्हा परिषद सदस्य