
कचराभूमीवर अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात
भाईंदर, ता.२७ (बातमीदार) : उत्तन येथील कचराभूमीला गेल्या आठ दिवसात दोनवेळा आग लागल्यामुळे कचराभूमीवर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तसेच कर्मचारी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान रविवारी लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाकडून पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले पण या आगीमुळे निर्माण झालेला धूर तसेच कचऱ्यातून निघणारा रासायनिक वायू यामुळे रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या वाहनावरील एक चालकाला चक्कर आली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. या कर्मचाऱ्याची तब्येत आता ठीक असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आठ दिवसांपूर्वी कचराभूमीला लागलेल्या भीषण आगीनंतर रविवारी (ता.२६) देखील कचऱ्याच्या साठ्याला पुन्हा आग लागली. रात्री उशिरा ही आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर पाण्याचे फवारे मारुन हा कचरा थंड करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. आग विझवण्याचे काम सुरु असताना रात्री उशिरा अग्निशमन दलाचा चालक वैभव पाटील याला चक्कर आली. आगीमुळे निर्माण झालेला प्रचंड धूर तसेच कचऱ्यातून बाहेर पडणारा विषारी वायू यामुळे चालकाला चक्कर आली. त्याल रात्रीच भाईंदर येथील पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी त्याला रुग्णलायातून घरी सोडण्यात आले.
कचऱ्याला आठ दिवसात दोन वेळा आग लागल्यामुळे त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आता तैनात ठेवण्यात आल्या आहे. त्यासोबत पाण्याचे दोन टँकर, अग्निशमन दलाचे २७ कर्मचारी चोवीस तास उपस्थित ठेवण्यात आले आहेत. या सर्वांवर अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
उष्णता वाढल्याचा फटका
सध्या उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कचऱ्याच्या साठ्यात विषारी वायू तयार होऊन त्याला आग लागण्याची शक्यता आहे. दर उन्हाळ्यात कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात या पार्श्वभुमीवर कचराभूमीवर सध्या अग्निशमन दल तैनात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आग लागल्यास त्यावर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.