ठाण्यात पाणीटंचाई कायम

ठाण्यात पाणीटंचाई कायम

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : महापालिकेच्‍या स्व-योजनेतून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे शहरात झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्याच्या घडीला या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, पाणीपुरवठा पूर्ववत झाला असल्याची माहिती पालिकेने दिली. ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागातून पाणीटंचाईच्या तक्रारींचा भडीमार पालिका प्रशासनाकडे सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे मागील आठवड्यात बुधवारपासून चार दिवस पाणी कपात करीत झोनींग पद्धतीने पाण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्याचा पहिला फटका हा वागळे, ठाणे, घोडबंदर, कोपरी भागात बसला. या भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली होती. या कामामुळे गेल्या मंगळवारपासून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात लागू करण्यात आली. शनिवारपर्यंत ही कपात लागू राहणार होती. या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पालिकेने शनिवारपर्यंत विभागवार पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शनिवारी काम पूर्ण करत रविवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूवर्वत केला आहे. परंतु, या भागांमध्ये अद्यापही टंचाईची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.
-----------------------------
मुंब्रा परिसराला फटका
ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागात पाणीटंचाई असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या असून त्यासाठी नागरिक समाज माध्यमांचा वापर करीत आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात एमआयडीसी, कोपरी आणि वागळे इस्टेटमधील काही भागात मुंबई महापालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. या दोन्ही स्रोतांमार्फत होणारा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याने हे परिसर टंचाईमुक्त असल्याचे चित्र आहे. मुंब्रा येथील ठाकुरपाडा भागात गेले तीन दिवस पाणी नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
..............................
४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा
ठाणे शहराला रोज ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. पाण्याची गळती रोखण्यासाठी स्मार्ट मीटर लावले आहेत. जुन्या जलवाहिन्या बदलून किंवा दुरुस्त करून गळती रोखण्यासाठी प्रयत्न होत आहे. तर टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध होऊन १५० वाहिन्यांच्या माध्यमातून ठाणेकरांपर्यंत पोहोचत आहे.
...........................
शहराला रोज किती पाण्याची गरज?
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. त्यानुसार ठाणे शहराला रोजच्या रोज विविध स्रोतांच्या माध्यमातून ४८५ दशलक्ष लीटर पाणी मिळत असल्याची माहिती महापालिकेने दिली. परंतु शहराला १०० दशलक्ष लीटर पाणी अधिकचे मिळत आहे.
.......................
सर्वच स्रोत महत्त्‍वाचे
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्ष लीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्रोत शहरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्‍टिकोनातून महत्त्‍वाचे मानले जातात.
..........................
मागील चार दिवस सुरू असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, रविवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूवर्वत केला आहे. पाणीपूरवठा पूवर्वत झाल्यानंतरही टंचाईची समस्या जाणवत असेल तर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करावी.
- विनोद पवार उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे पालिका
.....................................
मागील आठवड्यात चार दिवसांपासून पाणीकपात करण्यात आल्यामुळे पाणीटंचाईची समस्या भेडसावत होती. या काळात आमच्या परिसरात असलेल्या बोरिंगचा आम्हाला आधार ठरला आहे. बोरिंगवर जाऊन पाण्याची गरज भागविण्यात आली.
- मंगल कोयते, नागरिक, कोपरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com