
नगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव द्यावे
ठाणे, ता. २७ : नगर जिल्ह्यातील चौंडी हे गाव अहिल्यादेवी होळकर यांचे मूळ जन्म गाव आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घाट, मंदिरे बांधली, तसेच भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्या अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नगर जिल्ह्याला देऊन नामांतर करावे, या मागणीसाठी यशवंत सेना आक्रमक झाली आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदारांची भेट घेऊन नामांतराचा प्रश्न विधानसभा व लोकसभेत मांडावा, यासाठी निवेदन देण्यात येत आहे, असे संघटनेकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. या मागणीला पाठिंबा मिळत आहे, या अनुषंगाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातून धनगर समाजाचा नगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ असे व्हावे, यासाठी यशवंत सेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजीत कोकरे व धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या माध्यमातून खासदार राजन विचारे, ऐरोली आमदार गणेश नाईक, ठाणे शहर आमदार संजय केळकर यांना निवेदन देत हा प्रश्न लोकसभा व विधानसभेत मांडण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले.