महापालिकेने दीडशे कोटींचा टप्पा ओलांडला

महापालिकेने दीडशे कोटींचा टप्पा ओलांडला

भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : आर्थिक वर्ष संपायला अद्याप एक महिना शिल्लक असताना मिरा-भाईंदर महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीचा दीडशे कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्याअखेर केवळ १६१ कोटी रुपयांचा कर वसूल झाला होता. यंदा मात्र कराची वसुली दोनशे कोटींपर्यंत जाईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्रशासनाला २२२ कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट प्रशासकीय अंदाजापेक्षा कितीतरी अधिक होते. त्यामुळे प्रशासनाने किमान १९० कोटी रुपये करवसुली करण्याचे ध्येय निश्चित केले होते. मात्र ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराची १६१ कोटी रुपयेच वसुली झाली होती. त्यामुळे यंदा ही कसर भरून काढण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यातच मालमत्ता कराच्या वसुलीत पंचवीस टक्के वाढ केली तरच पंधराव्या वित्त आयोगाकडून अनुदान मिळेल, असा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढवण्याच्या सूचना आयुक्त दिलीप ढोले यांनी दिल्या आहेत. मालमत्ता कराची वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या मालमत्ता जप्त करणे, त्यांचा लिलाव करणे अशा उपाययोजना करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर कर वसुलीसाठी विविध विभागांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकेही स्थापन करण्यात आली आहेत.
प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे फेब्रुवारी महिन्यातच १५० कोटी रुपयांचा वसुलीचा टप्पा ओलांडण्यात कर विभागाला यश आले आहे. मागील वर्षी मार्च महिन्याअखेर हा टप्पा ओलांडला गेला होता. त्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली ही दुप्पट वेगाने झाली असून मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याचा प्रशासनाचा दावा आहे.
.....
ऑनलाईन भरण्याला पसंती
महापालिकेच्या संगणक विभागाकडून अद्ययावत केलेले महापालिकेचे संकेतस्थळ तसेच MyMBMC मोबाईल ॲपचा वापर मालमत्ता कर भरणा करण्यासाठी नागरिकांकडून विशेष पसंती देण्यात आली असल्याचे वसुलीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत मिरा-भाईंदर महापालिका तिजोरीत एकूण मालमत्ता कर १५० कोटी ६१ लाख १७ हजार ८६७ इतका जमा झाला आहे. त्यात ऑनलाईन पद्धतीने ५९ कोटी ७२ लाख ४२ हजार ७११ रुपये, तर रोख रक्कम व धनादेशाद्वारे ९० कोटी ८८ लाख ७५ हजार १५६ रुपये इतका मालमत्ता कर भरणा झाला आहे, अशी माहिती कर विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.
....
प्रशासनाचे आवाहन
महापालिकेकडून करण्यात येणाऱ्‍या विकासकामांचा वेग मालमत्ता कराच्या वसुलीवर अवलंबून असल्यामुळे ३१ मार्च आधी नागरिकांनी कर भरणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी ऑनलाईन सुविधा MyMBMC ॲप किंवा www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन कर भरणा करावा व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com