
मुक्तछंद काव्यप्रकाराचे प्रवर्तक
मुक्तछंदाचे प्रवर्तक
मराठीतील मुक्तछंद काव्याचे प्रवर्तक मानले जाणारे कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ ‘अनिल’ यांनी दशपदी हा नवा काव्यप्रकार निर्माण करून लोकप्रियही केला. गीतकार म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत. त्यांचा जन्म १९०१ मध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी झाला. पुढील शिक्षणासाठी त्यांनी १९१९ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर १९३५ मध्ये विधी शाखेची सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९४८ मध्ये मध्य प्रदेश सरकारतर्फे त्यांची सामाजिक शिक्षण संस्थेचे उपमुख्याधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. १९५६ मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्राचे मुख्याधिकारी व त्यापुढे १९६१ मध्ये भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागारपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. कवी अनिल यांना १९७९ ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. १९५८ मध्ये मालवणमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. कवी अनिल यांचे ‘दशपदी’, ‘निर्वासित चिनी मुलास’ (दीर्घकाव्य), ‘पेर्ते व्हा’, ‘फुलवात’, ‘भग्नमूर्ती’ (दीर्घकाव्य), ‘सांगाती’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘संपूर्ण कविता’ या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार मिळाला आहे.
- अनिल साबळे