राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे सुविधांचे विस्तारीकरण

राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे सुविधांचे विस्तारीकरण

कोविडनंतर मानसिक आरोग्याचा विळखा
रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने आहार, व्यायाम आणि समुपदेशनावर भर

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : कोविड महामारीदरम्यान प्रत्येकालाच मानसिक समस्यांचा सामना करावा लागला. गंभीर म्हणजे कोरोना महामारीमुळे राज्यातील आठ जिल्ह्यांतील रुग्णांना सेवा देणाऱ्या ठाणे प्रादेशिक मानसिक रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यासह इतर मानसिक रुग्णालयांतही अशीच परिस्थिती आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे सुविधांचे विस्तारीकरण करण्यात आले असून औषधांशिवाय रुग्णांचा आहार, व्यायाम आणि समुपदेशनावर भर देण्यात आला आहे.
राज्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये ठाणे रुग्णालयात ३ हजार २९ मानसिक रुग्ण दाखल झाले होते. २०२२ मध्ये ५ हजार ५५७ रुग्‍ण भरती झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. सध्या १,०८३ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यातील ठाणे, पुणे, रत्नागिरी, नागपूर आणि गेल्या वर्षीपासून बीड जिल्ह्यात अंबेजोगाई प्रादेशिक मानसिक रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. ठाणे रुग्णालयात मुंबईसह आठ तालुक्यांतील रुग्ण दाखल होत असतात. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार समुपदेशनातून जवळपास ८० टक्के समस्या कमी होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चारपैकी एकामध्ये मानसिक समस्या असू शकतात. देशाच्या अहवालानुसार फक्त सात टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले जातात. २०२० मध्ये कोविडमुळे ओपीडी बंद असल्याने रुग्णांची नोंद झाली नव्हती. २०२१ मध्ये सर्व निर्बंध हळूहळू उठले; पण कोविड, लॉकडाऊन आणि बेरोजगारी असे प्रश्न अनेकांना सतावत होते. परिणामी पुन्हा एकदा रुग्णांची गर्दी वेगवेगळ्या कारणांनी ओपीडी आणि आयपीडीमध्ये वाढू लागली.
सरकारने लॉकडाऊनदरम्यानचे निर्बंध उठवल्यामुळे आणि गंभीर रुग्ण दाखल असताना मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी रुग्णालयात भेट देण्यास सुरुवात केल्यामुळे गेल्या वर्षीची संख्या जास्त आहे, असे निरीक्षण ठाणे आरएमएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी नोंदवली.
---
मानसिक आरोग्याचे प्रमाण वाढलेले नाही, तर त्यांचे निदान होण्यात वाढ झाली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मनशक्ती क्लिनिक स्थापन करण्यात आले असून तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसोपचारतज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले गेले आहे. प्रशिक्षणानंतर मानसिक सौम्य आजारांसाठी तिथेच समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे असे रुग्ण समोर यायला लागले आहेत. साहजिकच आकडेवारी वाढलेली दिसते. त्याशिवाय टेलिमानस टोल फ्री क्रमांक (१४४१६) सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी ५३ समुपदेशकांची नियुक्ती झाली असून २४ तास सेवा सुरू आहे. जे रुग्ण सौम्य आजारांसाठी रुग्णालयापर्यंत पोहचू शकत नाहीत ते टोल क्रमांकावर संपर्क करून सल्ला घेऊ शकतात.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य सेवा संचालक

हजारात एक रुग्ण गंभीर
मानसिक आजाराचे स्वरूप फक्त गंभीर असते असेही नाही. हजारातून एखादा रुग्ण गंभीर स्वरूपाचा असतो. बाकी सर्व सौम्य लक्षणांचे रुग्ण असतात. भीती वाटणे, हाताला घाम येणे, छातीत धडधड होणे, बोटांची थरथर होणे, इन्सोमेनिया म्हणजेच झोप न येणे आदी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे आजाराचे स्वरूप गंभीर होत नाही. औषधांशिवाय त्यांचा आहार आणि व्यायामावर भर दिला जातो. त्यामुळे त्यांच्या गुणात्मक कार्यक्षमतेवर आणि विचारांवर सकारात्मक परिणाम होतो.

सुविधांचा विस्तार
राज्य सरकारने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मनशक्ती क्लिनिक सुरू केले आहेत. राज्यात १९५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी १४७१ केंद्रांत मनशक्ती क्लिनिक सुरू आहे. उर्वरित ठिकाणी ३१ मार्चपर्यंत सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मनशक्ती केंद्रात एकूण सात जणांची टीम कार्यरत आहे. मानसोपचारतज्ज्ञांपासून इतर सहकाऱ्यांचा त्यात समावेश आहे, असे डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.

ठाणे प्रादेशिक मानसिक रुग्णालयातील आकडेवारी
दाखल मानसिक रुग्ण
वर्ष २०२० २०२१ २०२२
पुरुष २३१ २०७८ ३७४४
महिला १८७ ९५१ १८१३
एकूण ४१८ ३०२९ ५५५७

ओपीडी पातळीवर दिलेले उपचार
वर्ष २०२० २०२१ २०२२
पुरुष १२१४६ १८५३१ ३८२२७
महिला ७८१३ १२११६ २४४२४
एकूण १९९५९ ३०६४७ ६२६५१

डिस्चार्ज दिलेले रुग्ण
वर्ष पुरुष महिला एकूण
२०२० ३७५ २१८ ५९३
२०२१ ११६० ५१९ १६७९
२०२२ १२८३ ६४६ १९२९

....................................................
वर्तणुकीवर परिणाम करणारे विशिष्ट घटक
ताणतणाव
शरीरातील अंतर्गत बदल
पूर्वानुभव
सुप्त मानसिक प्रक्रिया
......................................
मानसिक विकारांची लक्षणे
शरीर क्रियांमधील बदल
वागण्यातील बदल
बोलणे आणि विचार प्रक्रिया
भावना
संवेदना
..............................
मानसिक आजार म्हणजे काय?
जेव्हा कारणाशिवाय वागणुकीत बदल होतो आणि त्यात अतिशयोक्ती असते. असा बदल फार काळ टिकतो आणि त्यामुळे संबंधित व्यक्तीला किंवा इतरांना त्रास होतो. अशा वेळी अशी वागणूक अस्वाभाविक समजली जाते. कामाशी संलग्न असलेले संबंध बिघडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com