
पालघरमधील पेन्शनधारकांचा एल्गार
पालघर, ता. २७ (बातमीदार) : देशभरातील ६७ लाख ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाबाहेर सोमवारी (ता. २७) तीव्र निदर्शने केली. यात पालघर जिल्ह्यातील अडीच हजार निवृत्तांनी ठाणे व कांदिवली येथील निदर्शनात सहभाग घेतला.
आयुष्यातील उमेदीची वर्षे विविध माध्यमातून देश उभारणीसाठी घालविलेल्या या निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचशे ते तीन हजार इतक्या अत्यल्प पेन्शन मिळत आहे. त्यामुळे किमान नऊ हजार पेन्शन व महागाई भत्ता, वैद्यकीय सुविधा, न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी, वारसदारास शंभर टक्के पेन्शन आदी मागण्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे करण्यात आल्या आहेत. ईपीएफओ संस्थेने सुरवातीपासून किमान पेन्शन व सर्वोच्च न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणीबाबत जाणिवपूर्वक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याबाबतचा संतापही यावेळी व्यक्त झाला.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेपूर्वी आमच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुक निकालावरुन धडा घ्या असा इशारा यावेळी देण्यात आला. यापुढे जो ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या हिताचे निर्णय घेईल, तोच दिल्लीच्या तख्तावर असेल याची जाणिव सर्व राजकीय पक्षांनी ठेवावी, असे आवाहन पालघर विभागाचे अध्यक्ष अनिल ताहाराबादकर, प्रदीप पाटील, अशोक राऊत, रवींद्र कदम, जयप्रकाश जवेर, बाळा पेडणेकर, रवींद्र आजगावकर, राजू घरत व भगवान सांबरे आदी नेत्यांनी केले.