
मराठी भाषा निरोगी व समृद्ध
वसई, ता. २७ (बातमीदार) : अनेक पालकांचे मुलांच्या मानसिक सांस्कृतिक, वैचारिक संगोपनाकडे लक्ष नाही. भाषा पेनच्या नव्हे तर जिभेच्या टोकावर आहे. भाषा बोलली जाते तेव्हा आनंद होतो. मराठीत असंख्य बोलीभाषा आहेत. वसईतदेखील बोलीभाषा आहे. मराठी भाषा समृद्ध, निरोगी व सुंदर आहे, असे प्रतिपादन साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी वसईत केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखा व न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भाषा दिन सोहळ्याचे आयोजन कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबरीश मिश्र होते; तर जेष्ठ साहित्यिका वीणाताई गवाणकर, सहाय्यक पोलिस आयुक्त पद्मजा बढे, कोमसापचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे, वसईचे कार्याध्यक्ष रेमंड मच्याडो, प्राचार्या शोभना वाझ व्यासपीठावर उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने पिझ्झा मागवला जातो; मात्र एक पुस्तक आपण मागवतो का? हा प्रश्न मनाला विचारा, शिक्षण पद्धतीलादेखील मशीन करून ठेवले आहे. वसईत ख्रिश्चन धर्मातल्या लोकांनी मराठीत अत्यंत सुंदर लिखाण केले आहे. मराठीत साहित्य भरपूर आहे. आपण आपल्या भाषेचे शत्रू आहोत. नसांमध्ये जस रक्त वाहते तितकी सहज भाषा आहे, असेही अंबरीश यांनी सांगितले.
या वेळी अंबरीश मिश्र सहाय्यक पोलिस आयुक्त पद्मजा बढे व अनिलराज रोकडे यांचा सत्कार करण्यात आला. कोमसापचे कार्यवाह संतोष गायकवाड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसई शाखेचे कार्याध्यक्ष रेमंड मच्याडो यांनी, मनोगत जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे व प्राचार्या शोभना वांझ यांनी; तर सूत्रसंचालन दीपाली ठाकूर व निवृत्त प्राचार्य कृष्णा उभाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.