
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आजपासून एल्गार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने गेली साडेपाच वर्षे; तर केंद्राने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही. तसेच २० फेब्रुवारीपासून संप करूनही सरकारने कृती समितीला चर्चेसाठी पाचारण केले नाही. त्यामुळे संतप्त अंगणवाडी कर्मचारी उद्यापासून (ता. २८) आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
पोषण, शिक्षण, आरोग्य विषयक महत्त्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व महागाई भत्त्यासह वेतनश्रेणी, मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाईल, ग्रॅच्युईटी लागू करणे, आहार व इंधनाचे दर, अंगणवाडीचे भाडे वाढवणे, आहार, टीएडीए आदी थकीत देयकांच्या मुद्द्यांवर आश्वासनांव्यतिरिक्त काहीच मिळाले नसल्याने अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. कर्मचारी गेली दोन वर्षे सातत्याने लढा देत आहेत. मागण्या मान्य करण्याच्या मुद्द्यावर आश्वासनांच्या पलीकडे या कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले.
कोरोना काळात केलेल्या सेवेची दखल घेऊन सरकार मानधन वाढवेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला जात आहे; मात्र प्रत्येक वेळेस निराशाच पदरात पडली. प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारने अंगणवाड्या दत्तक देण्याची कल्पना काढून खासगीकरणाकडे पावले टाकायला सुरुवात केली आहे. या परिस्थितीत दुसरा मार्ग शिल्लक न राहिल्यामुळे नाइलाजाने कृती समितीच्या वतीने हा संप जाहीर करावा लागल्याचे सांगण्यात आले.